स्वये श्री रामप्रभु ऐकती, कुश लव रामायण गाती..!

सोमनाथ कोकरे
मंगळवार, 4 एप्रिल 2017

चित्रकार आनंद सोनार यांनी साकारला अलंकारिक शैलीतील प्रसंग

समर्पक मांडणीने चित्रांची भुरळ कायम
श्रीरामांच्या तिन्ही माता बालकांची गायनलीला कुतूहलाने ऐकत आहे, तर अयोध्यानगरीतील सर्वच जण बालगायकांचे कौतुक करत आहेत, असा भाव प्रत्येकाच्या चेहऱ्यावरून व हातांवरून जाणवत आहे.

नाशिक : कुमार दोघे एक वयाचे, सजीव पुतळे रघुरायाचे, पुत्र सांगती चरित्र पित्याचे, ज्योतीने तेजाची आरती... गीतकार ग. दि. माडगूळकर व गायक सुधीर फडके अर्थात, बाबूजींच्या गळ्यातून उतरलेल्या 'गीतरामायण' चित्रपटातील गीतांची भुरळ भारतीयांवर कायम आहे. छोट्या छोट्या कडव्यांतून त्या काळातील संपूर्ण प्रसंगच ऐकताना, पाहताना आपले डोळे पाणावले नाही तर नवलच...

रामायणातील प्रभू श्रीरामांच्या जीवनातील एक सुंदर प्रसंग चौदा वर्षांपासून दर वर्षी 'सकाळ'च्या वाचकांसाठी ज्येष्ठ चित्रकार आनंद सोनार त्यांच्या भारतीय अलंकारिक शैलीत साकारतात. यंदाही रामनवमीनिमित्त राजमहालातील कुश-लवांच्या रामचरित्र गायनाचा. नटलेली अयोध्यानगरी, शरयू नदी, चित्रांची समर्पक मांडणी, रामचरित्र गायन ऐकणाऱ्यांचे हावभाव, मनमोहक रंगसंगती समर्पकपणे रेखाटली आहे.

अश्‍वमेध यज्ञासाठी संपूर्ण अयोध्यानगरी नटली आहे. माणसांचा जनसागर लोटला आहे. तेवढ्यात प्रभू श्रीरामांच्या कानावर सुस्वर येऊन पडतात, तोच हे स्वर कोठून व कोणाचे, हे राजमहालाच्या सज्जातून प्रभू श्रीराम पाहतात. तामस वेश धारण केलेले दोन बटू आणि मुनी दृष्टीस पडतात. त्यांना प्रभू श्रीराम आदरपूर्वक राज महालात बोलवतात. राजमंडपात येताच ते दोन बटू प्रभू श्रीरामांना अभिवादन करतात. ते म्हणतात, ''आम्ही महर्षी वाल्मीकींचे शिष्य आहोत. त्यांनी शिकवलेल्या श्रीराम चरित्राचे गायन करतो.'' तोपर्यंत श्रीरामांना माहीत नव्हते, की आपल्यासमोरील हे चिमुकले म्हणजे आपलेच पुत्र कुश-लव आहेत.

यंदाच्या चित्रात श्रीराम सिंहासनावर बसून लक्षपूर्वक व कौतुकाने त्या दोन चिमुकल्यांचे गायन ऐकत आहेत. श्रीरामांपासून क्षणभरही लांब न जाणारा बंधू लक्ष्मण पाठीमागे उभा आहे. खाली भरत, शत्रुघ्न व हनुमान बसले आहेत. चित्राच्या मध्यभागी मंचकावर वीणा धारण करून कुश-लव मुनींच्या सोबत मंजुळ स्वरात तल्लीन होऊन रामायण गात आहेत. श्रीरामांच्या तिन्ही माता बालकांची गायनलीला कुतूहलाने ऐकत आहे, तर अयोध्यानगरीतील सर्वच जण बालगायकांचे कौतुक करत आहेत, असा भाव प्रत्येकाच्या चेहऱ्यावरून व हातांवरून जाणवत आहे. चित्राच्या वरच्या बाजूला दुथडी वाहणारी पवित्र शरयू नदी. काठावरील सजलेली अयोध्यानगरी रेखाटली आहे. चित्रामध्ये भरभराट, सुबत्ता व चैतन्य दाखवण्यासाठी हिरवा, तर ऐश्‍वर्य दाखविण्यासाठी जांभळा व निळा रंग वापरला आहे.

Web Title: sakal special painting for shri ram janmotsav