उपवासाची भगर ठरतेय आरोग्यासाठी वरदान 

Residential photo
Residential photo

नाशिकची भगर देशभरात प्रसिद्ध : पंतप्रधानांकडूनही दखल 

नरेश हळणोर 
नाशिक : "नाशिकचा कांदा, नाशिकची द्राक्ष, नाशिकची वाईन' अशी सातासम्रुदापार "नाशिक'ची ओळख पोहोचली असताना, त्यात आणखी भर पडली आहेत ती "भगरी'ची. उपवास असेल तर साबुदाणा वा फलाहाराला पर्याय म्हणून क्वचितच खाल्ल्या जाणाऱ्या भगरीला अलिकडे देशभरातूनच नव्हे तर परदेशातून मागणी वाढली आहे. ती ही "नाशिक'च्याच भगरीला. भगवान जगन्नाथपुरी येथे कोट्यवधी भाविकांसाठी "खीर' केली जाते, तीही नाशिकच्याच "भगरी'पासून. वरईपासून दाणेदार भगरीचे देशभरात सर्वाधिक उत्पादन नाशिकमध्ये होते. एरवी, श्रावण-नवरात्रोत्सवात तेजीत असणारी भगर आता बाराही महिने ग्राहकांना हवी असते. त्यामागील महत्त्वाचे कारण म्हणजे, तिच्यातील आरोग्यदायी गुणधर्म. 

सर्वाधिक उत्पादन नाशिकमध्ये 
वरईवर प्रक्रिया करणाऱ्या 42 पेक्षा अधिक भगर मिल नाशिक जिल्ह्यात आहे. घोटी, इगतपुरी आणि शहापूर येथे मिल आहेत. एका मिलमध्ये दिवसाला किमान 5 टन भगरीचे उत्पादन होते. तर ओरिसातून सर्वाधिक वरईचे पीक घेतले जाते. आदिवासी शेतकऱ्याच्या बांधावरून वरई थेट मिलमध्ये येते. नाशिकमधून दिल्ली, उत्तरप्रदेश, हरियाणा, राजस्थान, गुजरात, मध्यप्रदेश, ओरिसा, झारखंड, उत्तराखंड या राज्यांमध्ये शेकडो टन भगर जाते. याशिवाय, युरोप, अमेरिकेतूनही मागणी वाढली आहे. कोणत्याही रासायनिक खतं-औषधांचा वापर होत नाही. त्यामुळे नैसर्गिक पिक म्हणूनच याकडे पाहिले जाते. 

आरोग्यदायी भगर 
विशेषत: श्रावण-नवरात्रोत्सवात भगरची मागणी असते. डॉक्‍टरांकडूनच साबुदाणा न खाण्याचा सल्ला दिला जातो. भगर पचनाला हलकी, नो कॅलिरिज, नो शुगर आहे. वजनही वाढत नाही. मधुमेही, हृदयरोग रुग्णांसह वजन कमी करण्यासाठीही आहारतज्ज्ञांकडून भगर खाण्याचाच सल्ला दिला जातो. भगरीची खिचडी, इडली, शिरा, खीरही करता येते. 

पंतप्रधानांकडून प्रशंसा 
गेल्या ऑगस्ट महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी "मन की बात'मधून नैसर्गिक धान्य आहारावर बोलताना ज्वारी, बाजरी आणि भगर यांचा निरोगी आरोग्यासाठी आहारात समावेश करण्याचे आवाहन केले आहे. त्यातही भगरीचा विशेष उल्लेख करीत त्यांनी ट्‌वीटही केले होते. 
... 
भगवान जगन्नाथ पुरीची खीर 
ओरिसात भगवान जगन्नाथ पुरीचा उत्सव जगप्रसिद्ध असून, यासाठी कोट्यवधी भाविक येतात. भाविकांसाठी खीर प्रसाद म्हणून दिली जाते. ती खीर नाशिकच्याच भगरीपासून बनविली जाते. ओले नारळाचे दूध, गुळ आणि भगर यापासून ही खीर बनविण्यात येते. 
 
गुणकारी भगरमधील गुणधर्म 
* नो-कॅलेरिज 
* शुगर अत्यल्प 
* फायबरचे, आयर्न, कॅल्शियमचे प्रमाण अधिक 


ऑर्गेनिक आहाराकडे वळत असताना, भगर हाच सर्वोत्तम पर्याय आहे. भगरीवर कोणत्याही प्रकारची रासायनिक प्रक्रिया होत नाही. आदिवासीं शेतकऱ्यांकडून वरईचे उत्पादन घेतले जाते, त्यांचे आभारच मानले पाहिजे. कधीकाळी फक्त उपवासाच्या काळातच भगरला मागणी असायची. गेल्या काही वर्षात सातत्याने भगरला मागणी असते. त्यातही नाशिकची भगर देशात फेमस आहे. 
- महेंद्र छोरिया, अध्यक्ष, राज्य भगर मिल असोसिएशन. 


मधुमेह, हृदयविकार असलेल्यासाठी भगर सर्वोत्तम आहार आहे. विशेषत: लठ्ठपणामुळे हृदयाचा विकार बळावतो. आहारात भगरीचा समावेश असेल तर वजनही कमी होते. जी जीवनसत्त्वे रुग्णाला आवश्‍यक आहे ती भगरीतून मिळतात. शिवाय ती ऑर्गेनिक असल्याने कोणतेही दुष्परिणामाची शक्‍यता नाही. 
- डॉ. वैभव पाटील, हृदयरोगतज्ज्ञ. 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com