esakal | भरधाव कारच्या धडकेत दोन पोलीस गंभीर 
sakal

बोलून बातमी शोधा

live photo

भरधाव कारच्या धडकेत दोन पोलीस गंभीर 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा


हेल्मेटमुळे वाचले दोघांचा जीव : धडकेत दुचाकी जळून खाक 

नाशिक : नाशिकरोड पोलीस ठाण्याचे रात्रपाळीचे बीटमार्शल दोघे पोलिसांच्या दुचाकीला भरधाव वेगातील कारने जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये दोघे पोलीस गंभीर जखमी झाले असून केवळ त्यांच्या डोक्‍यात असलेल्या हेल्मेटमुळे दोघांचेही प्राण वाचले आहेत. दोघांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू प्रकृती गंभीर आहे. दरम्यान, या भीषण अपघातात दुचाकीने पेट घेतला आणि जळून खाक झाली. याप्रकरणी संशयित कारचालक हा नाशिक बार असोसिएशनच्या अध्यक्षांचा मुलगा असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

देविदास शिंदे, राजाराम ठाले असे नाशिकरोड पोलीस ठाण्यातील रात्रपाळीचे जखमी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. शिंदे व ठाले हे दोघे शनिवारी (ता.31) रात्रपाळीच्या कर्तव्यावर होते. देविदास शिंदे हे दुचाकी चालवत होते तर ठाले हे त्यांच्यापाठीमागे बसलेले होते. मधरात्री एक वाजेच्या सुमारास ते नाशिकरोड रेल्वेस्थानकाकडून पोलीस ठाण्याकडे येत असताना, त्यांची दुचाकी पोलीस ठाण्याच्या गेटमध्ये वळत असतानाच, नाशिककडून येणाऱ्या भरधाव वेगातील टाटा नॅक्‍सॉन कारने (एमएच 15 जीआर 1119) पोलिसांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भयानक होती की, दुचाकीसह दोघांना तब्बल 35 फुटापर्यंत फरफटत नेले. या भीषण अपघातानंतर अवघ्या काही क्षणात दुचाकीने पेट घेतला. तर बीटमार्शल शिंदे व ठाले हे अत्यंत गंभीर जखमी झाले. शिंदे यांच्या एका पायाच्या मांडीच्या हाडाचे दोन तुकडे झाले, खुबा आणि कमरेच्या मणक्‍याला फॅक्‍चर झाले. तर ठाले यांच्या बरगड्यांना फॅक्‍चर झाले आहे. 
घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस आयुक्त इश्‍वर वसावे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बिजली हे घटनास्थळी पोहोचले. गंभीर जखमी दोघा पोलीस कर्मचाऱ्यांना तात्काळ महामार्गावरील व्होकार्ट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तर, नाशिकरोड अग्निशमन दलाचे जवान बंबासह दाखल झाले. लिडिंग फायरमन मोहन मधे, अशोक निलीमनी, मनोज साळवे, राजेंद्र आहेर, श्‍याम काळे, सुनील ताक, मंगेश गोसावी यांनी दोन्ही वाहनांना लागलेली आग विझविली. दुचाकी तर जळून खाक झाली. याप्रकरणी नाशिकरोड पोलीसात संशयित साहिल नितीन ठाकरे या कारचालकाविरोधात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक निरीक्षक जे.के. गोसावी करीत आहेत. दरम्यान, कारचालक साहिल ठाकरे हा नाशिक बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. नितीन ठाकरे यांचा मुलगा आहे. 

हेल्मेटमुळे वाचले दोघांचे प्राण 
देविदास शिंदे यांच्या मांडीचे हात तुटले, खुब्याला दोन्ही बाजुने फॅक्‍चर, तसेच कमरेच्या हाडालाही फॅक्‍चर झाले आहे. दोघाही पोलिसांनी डोक्‍यात हेल्मेट घातले होते. मात्र अपघातात दोघांच्या हेल्मेटचे तुकडे झाले असले तरी त्यामुळे दोघांचे प्राण मात्र वाचले. शिंदे यांच्या शरीरात अंतर्गत रक्तस्त्राव झाल्याने आज पहाटे पाच वाजेच्या सुमारास त्यांच्या हृदयाचे ठोके कमी झाल्याने ते बेशुद्ध झाले. प्रकृती गंभीर झाल्याने तात्काळ तीन रक्तपिशव्या देण्यात आले. तर दुपारी बारा वाजेपर्यंत पुन्हा तीन पिशव्या रक्त देण्यात आले. त्यानंतर त्यांची प्रकृती काहीशी स्थिर आहे. तर, ठाले यांच्या छातीच्या बरगड्यांना फॅक्‍चर असून दोघांच्या डोक्‍याला किरकोळ जखमा आहेत. पोलीस आयुक्त विश्‍वास नांगरे-पाटील, उपायुक्त विजय खरात यांनी रुग्णालयात येऊन दोघांच्या प्रकृतीची विचारपूस केली. 

loading image
go to top