esakal | जस्सी सॅम्युअल यांना पोलीस आयुक्‍तालयाकडून आर्थिक मदत प्रदान 
sakal

बोलून बातमी शोधा

live photo

जस्सी सॅम्युअल यांना पोलीस आयुक्‍तालयाकडून आर्थिक मदत प्रदान 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक : उंटवाडी रोडवरील मुथूट फायनान्सवरील सशस्त्र दरोड्याच्या घटनेत दरोडेखोरांची दोन हात करताना बळी गेलेले सॅजू सॅम्युअल यांची पत्नी जस्सी सॅम्युअल यांना नाशिक पोलीस आयुक्तालयातर्फे 2 लाख 10 हजार रुपयांचा धनादेश आज (ता.3) प्रदान करण्यात आला. सदरील गुन्ह्यांची उकल करीत पाच संशयितांना याप्रकरणी अटक केल्याने गुन्हेशाखेच्या तपासी पथकाला आयुक्तालयाकडून 2 लाख 10 हजार रुपयांचे रिवॉर्ड देण्यात आले असता, पोलिसांनी सदरची रक्‍कम सॅम्युअलच्या पत्नीस देण्याचे जाहीर केले होते. 

पोलीस आयुक्तालयात आयुक्त विश्‍वास नांगरे-पाटील, सहाय्यक आयुक्त आर. आर. पाटील यांच्या हस्ते मदतीचा धनादेश मृत सॅजू सॅम्युअल यांच्या पत्नी जस्सी यांना प्रदान करण्यात आला. यावेळी सॅम्युअल यांची चिमुकली मुलगी त्यांच्यासोबत होती. यावेळी गुन्हेशाखा युनिट दोनचे पोलीस निरीक्षक दिनेश बर्डेकर, मुंबई नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व सदरच्या गुन्ह्यांत दरोडेखोरांच्या मुसक्‍या आवळणारे विजय डमाळ यांच्यासह सॅम्युअल यांचे नातलग उपस्थित होते. यावेळी जस्सी सॅम्युअल या भावनाविवश झाल्या होत्या. 
गेल्या 14 जून रोजी मुथूट फायनान्सच्या कार्यालयावर सहा सशस्त्र दरोडेखोरांनी दरोड्याचा प्रयत्न केला. मात्र त्यावेळी सॅजु सॅम्युअल यांनी दरोडेखोरांना एकट्याने प्रतिकार केला. त्यामुळे संतापलेल्या दोघा संशयितांनी त्यांच्यावर गावठी कट्ट्यातून आठ गोळ्या झाडून त्यांची हत्त्या केली होती. सॅम्युअल यांच्या प्रतिकारामुळेच दरोड्यांचा प्रयत्न फसला होता. कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेजवरून सॅम्युअल यांनी केलेल्या प्रतिकाराने पोलिसही अचंबित झाले होते. गुन्हेशाखेने गुन्हा घडल्यानंतर दहाव्या दिवशी उकल केली आणि त्यानंतर पाच संशयितांना अटक केली. यात सॅम्युअल यांना गोळ्या मारणाऱ्या दोघा कुख्यात दरोडेखोरांचाही समावेश आहे. पोलीस आयुक्त विश्‍वास नांगरे-पाटील यांनी या कामगिरीमुळे गुन्हेशाखेला 2 लाख 10 हजार रुपयांचे रिवॉर्ड जाहीर केले असता, सहाय्यक आयुक्त आर.आर. पाटील यांनी सदरची रिवॉर्डची रक्कम सॅम्युअल यांच्या कुटूंबियांना देण्याचे जाहीर केले होते. तसेच, फायनान्स कंपनीने दोन आठवड्यांपूर्वी कुटूंबियांच्या नावे 35 लाख रुपयांची रक्कम मुदत ठेव केली आहे. 

loading image
go to top