esakal | दोन "शिवाजीं'चे गारुड आजही मराठी समाजमनावर 
sakal

बोलून बातमी शोधा

Residential photo

दोन "शिवाजीं'चे गारुड आजही मराठी समाजमनावर 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक : बोलणं हेच साहित्याचे पहिले रुप प्रमाण मानून साहित्य संस्कृतीच्या गाभाऱ्यात शब्दसामर्थ्यांच्या बळावर मराठी रसिक श्रोत्यांच्या मनावर अधिराज्य गाजविले ते प्राचार्य शिवाजीराव भोसले आणि, त्याचवेळी पुराण, इतिहास आणि वर्तमानाचा सुरेख मिलाप घालून महाकादंबऱ्या हे लेखनाचे खास वैशिष्ट असलेले मृत्युंजयकार शिवाजी सावंत या दोन "शिवाजीं'चे गारुड आजही मराठी समाज मनावर अधिराज्य गाजतेय, असे प्रतिपादन पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष व लेखक प्रा. मिलिंद जोशी यांनी केले. 

गंगापूर रोडवरील शंकराचार्य न्याय संकुलाच्या सभागृहात ज्योती स्टोअर्स आयोजित "लेखक तुमच्या भेटीला' या व्याख्यानमालेत प्रा. मिलिंद जोशी हे बोलत होते. व्यासपीठावर आनंद जोशी, दिलीपराज प्रकाशनचे मधुर बर्वे, पत्रकार सुधीर कावळे, वैशाली बालाजीवाले उपस्थित होते. ज्योती स्टोअर्सचे वसंत खैरनार यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, वक्तृत्वाचे शस्त्र प्राचार्य शिवाजीराव भोसले यांना लाभले होते. कर्मवीर भावराव पाटलांच्या कमवा आणि शिका योजनेतून शिवाजीरावांमध्ये वैचारिक परिवर्तन होत गेले. पुण्यात शिक्षण घेताना, तत्कालिन प्रभावी वक्तृत्व असलेल्या वक्‍त्यांनी त्यांनी भाषणे ऐकली. त्यांच्या वक्तृत्वाने भारावून विद्यार्थ्यांनीच त्यांची भाषणे आयोजित केली. परंतु ते करीत असताना वाईट अनुभव पदरी आले. मात्र तेच मावळतीचे रंग, उगवतीचे रंग होतील यावर त्यांचा विश्‍वास होता. भाषणाला चिंतनाची किनार होती, जी श्रोत्यांना विलक्षण समाधीचा आनंद देई. तत्वचिंतक असतानाही विनोदबुद्धीही तितकीच तत्परताही होती. तत्कालिन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी शिक्षण विभागाचे देऊ केलेले मंत्रीपद आणि मोठा भाऊ मुख्यमंत्री असतानाच राष्ट्रपदीपदक जाहीर झाले असता तेही त्यांनी नाकारले होते. आचार-विचारांमुळे शब्दांना मंत्राचे सामर्थ्य प्राप्त करून देणारे प्राचार्य शिवाजीराव भोसले यांचे तेच यश होते. 
मृत्युंजयकार शिवाजी सावंत यांच्याविषयी बोलताना प्रा. जोशी म्हणाले, वयाच्या 23व्यावर्षी मृत्युंजयसारखी अजरामर कादंबरीकार सावंतांमुळे मराठी कादंबरी देशपातळीवर पोहोचली. शाळेच्या स्नेहसंमेलनातील कर्णावरची एकांकीका, त्यात श्रीकृष्णाची भूमिका केलेले शिवाजी सावंत यांना तेव्हापासूनच कर्णाचे आकर्षण होते. तेच खरे तर मृत्युंजय कादंबरीचे बिजारोपण. शिक्षकीपेशा स्वीकारलेल्या सावंतांना मृत्युंजय लिहिण्यापूर्वी प्रत्यक्ष कुरुक्षेत्राला जायचे होते. कोल्हापूरकरांनी 1800 रुपये जमा करून दिले. तीन महिन्यांच्या अथक परिश्रमानंतर त्यांनी मृत्युंजय लिहिली. परंतु कोणीही प्रकाशक ती छापण्यास तयार नव्हते. त्यावेळी ते गदिमांकडे गेले. ते मृत्युंजयचे पहिले वाचक. त्यांनीच कॉन्टिन्टेलला पत्र लिहिले आणि वि.स. खांडेकर ते कुसुमाग्रज, कुसुमाग्रज ते सुर्वे या परंपरेत पुढे नेले. आचार्य अत्रें यांनी त्यावेळी "मराठा'तून अग्रलेख लिहित शिवाजी सावंत यांना मृत्युंजयकाराची उपाधी दिली. महाकादंबऱ्या हेच त्यांचे वैशिष्ट्ये असले तरी त्यांना अथांग महासागरांचीच ओढ होती. छावा, युगंधर यासारख्या अजरामर कलाकृतींतून तेच दिसले अन्‌ आजही रसिक मनावर त्यांचे अधिराज्य असल्याचे ते शेवटी म्हणाले.  

 
 

loading image
go to top