एरंडोल- वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचालकाने तलाठ्याच्या दुचाकीला धडक देऊन ठार करण्याचा प्रयत्न केला. ट्रॅक्टर बंद पडल्यामुळे चालक फरारी झाला असून, वाळूमाफियांची दहशत व दादागिरी केव्हा संपणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे..तहसीलदार प्रदीप पाटील यांना रवंजा परिसरासह कांताई बंधारा येथून वाळूची चोरट्या मार्गाने वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. तहसीलदार पाटील यांनी रिंगणगावचे मंडलाधिकारी संजय साळुंखे यांना कारवाई करण्याचे कळविले. त्यावरून मंडलाधिकारी साळुंखे यांनी कढोलीचे तलाठी नितीन पाटील, सावदा प्रा.चा.चे तलाठी कडू इंगळे, खर्चीचे तलाठी सृष्टी खांदे, तलाठी विश्वास बरगे, कोतवाल भूषण म्हस्के आदी रवंजा येथून कांताई बंधाऱ्याकडे जात असताना, खेडी फाट्याजवळ एक विनाक्रमांकाचा ट्रॅक्टर वाहतूक करताना आढळला. महसूल पथकाने ट्रॅक्टर थांबवून चालकाकडे वाळू वाहतुकीबाबत परवाना विचारला असता, त्यांच्याकडे कोणताही परवाना नव्हता. .महसूल पथक ट्रॅक्टर एरंडोलकडे आणत असताना, खडके बुद्रुक गावाजवळ संशयित राजू रामचंद्र नन्नवरे आला आणि चालकास खाली उतरविले आणि ट्रक्टर भरधाव वेगाने दत्तमंदिराच्या दिशेने पळवून नेण्याचा प्रयत्न केला. संशयित राजू नन्नवरे याने तलाठी नितीन पाटील यांच्या दुचाकी (एमएच ५४, ए ५५४२)ला जोरदार धडक दिल्यामुळे ते खाली पडले. तलाठी पाटील व दुचाकी ट्रॅक्टरमध्ये अडकली. रस्ता चढावाचा असल्यामुळे तो बंद पडला. ट्रॅक्टर बंद पडल्यामुळे संशयित राजू नन्नवरे फरारी झाला..महसूल कर्मचाऱ्यांनी तलाठी नितीन पाटील यांना बाहेर काढले. त्यांच्या पायाला व खांद्याला गंभीर दुखापत झाली. ट्रॅक्टर बंद पडल्यामुळे सुदैवाने तलाठी पाटील थोडक्यात बचावले. याबाबत तलाठी नितीन पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित राजू नन्नवरे याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, तालुक्यात वाळूमाफियांची दहशत वाढली असून, यापूर्वीही उत्राण येथे प्रांताधिकाऱ्यांसह महसूल कर्मचाऱ्यांवर वाळूमाफियांनी प्राणघातक हल्ला करून ठार करण्याचा प्रयत्न केला होता. वाळूमाफियांना राजकीय आशीर्वाद असल्यामुळे त्यांची दहशत दिवसेंदिवस वाढतच आहे. उत्राण परिसरातील गिरणा नदीपात्रातून रोज रात्रभर वाळूची चोरट्या मार्गाने वाहतूक केली जात असून, त्यांच्याविरोधातही कारवाई करण्याची मागणी होत आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.