धानोरा (ता.चोपडा)- एकेकाळी हिरवळीने नटलेल्या जणू हिरवा शालू परिधान करून दिमाखात उभ्या असलेल्या येथील सातपुडा पर्वतावर वृक्षतोडीची धारदार कुऱ्हाड चालविणाऱ्या रानटी लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहे. सातपुडा पर्वतामधील जंगलात अज्ञातांकडून आगी लावून सर्रासपणे वृक्षतोड होताना दिसून येते. त्यामुळे जंगलात मिळणाऱ्या मौल्यवान वनस्पती, औषधीही नामशेष होत चालली आहेत. म्हणून याबाबत गांभीर्याने दखल घेऊन वरिष्ठ पातळीवरून कठोर कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे, अन्यथा सातपुडा जंगल नामशेष होण्यास वेळ लागणार नाही, अशी भीतीही यानिमित्त व्यक्त केली जाते.दरम्यान, सातपुडा पर्वतात मोठ्या प्रमाणावर जंगलाला आग लावून ते नष्ट करण्याचा प्रयत्न वनमाफीया करीत आहेत. त्यांच्यावर वरीष्ठ पातळीवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी वन्यप्रेमी करीत आहेत.