संवेदनाहीन शरीर त्याच्यासमोर हरले...

संवेदनाहीन शरीर त्याच्यासमोर हरले...

नाशिक -  सत्तावीस वर्षांपूर्वी इमारतीवरून पडल्यामुळे मणके, मज्जारज्जू तुटून छातीखालील संवेदनाहीन झालेल्या शरीरामुळे सर्व जीवन परावलंबी झाले होते. पण अशाही परिस्थितीत हार न मानता फक्त दहावी शिक्षण झालेले असताना पहिली ते पदवी आणि पदव्युत्तरपर्यंतच्या मुलांचे क्‍लासेस घेऊन स्वतःच्या जीवनाला आकार दिला. याशिवाय इंग्लिश स्पीकिंग तसेच स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांसाठीही वर्ग घेऊन त्यांच्यासाठी मार्गदर्शन वर्ग चालवत आहे. ही कहाणी आहे, पूर्णतः दिव्यांग असलेला आणि पलंगावर झोपून शिकवत यशस्वीरीत्या क्‍लासेस चालविणारा राहुल विंचूरकर यांची... 

इंदिरानगर येथील राहुल विंचूरकरचा जन्म १७ जून १९७४ चा. दहावीपर्यंतचे त्याचे आयुष्य सर्वसामान्य मुलासारखे होते. ऑटोमोबाईल इंजिनिअरचं स्वप्न उराशी बाळगलेले असताना दहावीनंतर इमारतीवरून पडल्यानंतर त्याचे तीन मणके आणि मज्जारज्जू तुटला. शस्त्रक्रियेनंतर स्टिलचे रॉड टाकण्यात आले. बावीस दिवस रुग्णालयात काढले. घरी आल्यानंतर कोणतीच हालचाल करता येत नाही. त्या वेळी जगायचं कसं, हा सगळ्यात मोठा प्रश्‍न निर्माण झाला. घरची परिस्थिती अतिशय बेताची होती. उपचार करणारे डॉ. भरत केळकर यांनीही वैद्यकीय शुल्कही घेतले नव्हते. पण आहे त्या परिस्थितीत काहीही करून स्वाभिमानाने जगण्याच्या विचारातून त्यांनी १७ जून १९९२ पासून लहान मुलांना शिकवायला सुरवात केली. दिव्यांग असल्याने कुणी विश्‍वास ठेवेना. सुरवातीला पाच रुपये महिना घेऊन इंग्रजी माध्यमाच्या एका पहिलीच्या मुलीला शिकवायला सुरवात केली. हे शिकवणं म्हणजे पलंगावर झोपूनच. पुढे हळूहळू मुले वाढायला लागली. पण राहुलचे इंग्रजी आणि गणित कच्चे होते. मिळालेल्या पैशातून त्याने इंग्रजी आणि गणिताची पुस्तके विकत घेत सेल्फ स्टडी सुरू केला. वाचनाचाही छंद लागला. आज स्वतःचे पाचशे पुस्तकांचे ग्रंथालय आहे. आत्मविश्‍वास वाढल्यानंतर दहावीच्या मुलांना शिकवायला सुरवात केली. दरम्यानच्या काळात इंग्रजी विषयीचा न्यूनगंड पूर्ण दूर केला. पुढे ‘मिरॅकल इंग्लिश स्पीकिंग’ नावाचा स्वतंत्र कोर्सच सुरू केला. अकरावी, बारावी, पदवी आणि पदव्युत्तर वर्गांनाही शिकवणे सुरू केले. बिझनेस कम्युनिकेशन, बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन आणि अर्थशास्त्र हे विषयदेखील शिकवायला सुरवात केली. इंटरनेटवर अभ्यास करून स्पर्धा परीक्षांची बेसिक तयारी कशी करावी, याविषयीही मार्गदर्शन केले. मात्र आता काम वाढत चालल्याने फक्त आठवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांवरच लक्ष केंद्रित केले. ज्या विद्यार्थ्यांना गणित अजितबात येत नाही, असे विद्यार्थी माझ्याकडे पैकीच्या पैकी गुण पडतात. विश्‍वास संपादन केल्यामुळे शहराच्या सर्वच भागातून मुले इंदिरानगरला येतात, असे तो आवर्जून सांगतो. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com