शहादा तालुका क्रीडा संकुलाची वाताहत

सकाळ वृत्तसेवा
Monday, 20 January 2020

ब्राम्हणपुरी येथील शहादा तालुका क्रीडा संकुलाची दोन वर्षातच बिकट अवस्था झाली आहे. या ठिकाणी चोरांची चंगळ, मद्यपींचा गोंधळ निर्माण झाल्याने शहरातील सुजाण नागरिकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. प्रशासनाने लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.

ब्राम्हणपुरी : शहादा तालुका क्रीडा संकुलाचा दोन वर्षात जणू भूत बंगला झाला आहे. सुरक्षारक्षकच नसल्याने ‘आओ-जाओ घर तुम्हारा‘ अशी स्थिती आहे. चोरट्यांसाठी हे संकुल जणू खुली तिजोरी आणि मद्यपींसाठी जणू मोफतच बार ठरला आहे. शासनाची एवढी मोठी वास्तू पण व्यवस्थेसह साऱ्यांचेच त्याकडे दुर्लक्ष झाल्याने आज तिला अवकळा आली आहे. लाखमोलाचे साहित्याची चोरी होत असून क्रीडा अधिकारी कार्यालय त्याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत.

शहादा शहराच्या मध्यभागी आणि नगरपालिकेपासून जवळ असलेले सामोसा मैदान कित्येक वर्षांपासून पडिक अवस्थेत होते. तेथे महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनाय, पुणे मार्फत एक कोटी रुपये खर्चून भव्य असे क्रीडा संकुल बांधण्यात आले होते. मात्र केवळ दोन वर्षातच या संकुलाची अवस्था वाईट झाली आहे. सार्वजनिक संपत्तीची ही अशी लूट पाहून नागरिकांना संताप येऊ लागला आहे. सद्यस्थितीत या क्रीडा संकुलात तळीरामाचा वावर वाढला आहे. तो सहज दृष्टीस पडतो. संकुलाच्या आवारातच ओपन जिमचे साहित्य बसविण्यात आले असून हे साहित्य चोरांसाठी खुली तिजोरी सिद्ध होत आहे. त्यांना जस-जशी आर्थिक गरज भासते, तसे ते या ठिकाणी येऊन खुल्या जिमचे साहित्य चोरून विकत आहेत. कोणाचाही पहारा नसल्याने त्यांना हे सहज साध्य होत आहे. या लोखंडी साहित्यासह लाईट फिटिंग, बोर्ड आदी सामानही चोरीस गेल्याचे दिसून आले आहे.

क्रीडा संकुल तळीरामांचे माहेरघर झाले आहे. रात्री-अपरात्री व चोरी छुप्या पद्धतीने तेथे मद्यपानासाठी तळीरामांची गर्दी होते. आपल्यासाठी जणू हा मोफत बारच शासनाने उपलब्ध करून दिला आहे अशा थाटात त्यांचा इथे वावर असतो. भविष्यात यातून एखादी अविचारी घटना घडू शकेल, मग तेव्हा प्रशासन जागे होणार आहे का ? असा प्रश्न सुजाण नागरिक विचारात आहेत.

एकदाही वापर नाही, मग ?

शहर आणि तालुक्यातील नागरिकांसाठी तसेच उद्योन्मुख खेळाडूंसाठी उभारलेल्या या क्रीडासंकुलांचा वापर तसा झालेलाच नाही. विविध शाळा, महाविद्यालयांच्या मैदानावर अनेक स्पर्धा होतात, मात्र त्या मुलांना सरावासाठी चांगली जागा मिळत नाही, यामुळे ते मागे पडतात. मग क्रीडा संकुल उभारूनही त्याचा युवकांना फायदा होत नसेल तर क्रीडा विभागाने याबाबत धोरण ठरविणे गरजेचे आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shahada Taluka sports complex is in bad condition