सटाण्यात मानधन वाढीसाठी तोंडाला काळ्या पट्ट्या लावून 'आशा'ची मुक निदर्शने

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 सप्टेंबर 2019

राज्यातील गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविकांच्या मानधनात वाढ करावी तसेच त्यांना शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा द्यावा यांसह विविध प्रमुख मागण्या गेल्या अनेक वर्षांपासून शासनदरबारी प्रलंबित आहेत. या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी बागलाण तालुका आशा व गटप्रवर्तक संघटनेतर्फे आज सोमवारी (ता.१६) येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यालगत पाच तास ठिय्या देऊन शासनाच्या निषेधार्थ तोंडाला काळ्या पट्ट्या लावत मुक निदर्शने करण्यात आली.

सटाणा : राज्यातील गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविकांच्या मानधनात वाढ करावी तसेच त्यांना शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा द्यावा यांसह विविध प्रमुख मागण्या गेल्या अनेक वर्षांपासून शासनदरबारी प्रलंबित आहेत. या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी बागलाण तालुका आशा व गटप्रवर्तक संघटनेतर्फे आज सोमवारी (ता.१६) येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यालगत पाच तास ठिय्या देऊन शासनाच्या निषेधार्थ तोंडाला काळ्या पट्ट्या लावत मुक निदर्शने करण्यात आली. या आंदोलनात तालुक्यातील तीनशेहून अधिक गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविका सहभागी असल्याने आंदोलनाचा फटका तालुक्याच्या आरोग्य सेवेवर झाला आहे.  

आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांच्या मानधनवाढीच्या मुद्द्यावरून वारंवार केलेली आंदोलने आणि मोर्चांनंतर फेब्रुवारी २०१९ मध्ये सार्वजनिक आरोग्यमंत्र्यांनी त्यांच्या मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र त्यानंतर अद्याप कोणतीही कारवाई झालीच नसल्याने गेल्या १२ दिवसांपासून महाराष्ट्र राज्य आशा व गटप्रवर्तक संघटनेतर्फे राज्यस्तरीय बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे.

तालुक्यातील गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविकांनी आज सकाळी अकरा वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा परिसरात ठिय्या दिला आणि तोंडाला काळ्या पट्ट्या लावून मुक निदर्शने केली. आंदोलनकर्त्यांनी शासनाचा तीव्र शब्दात निषेध केला. सहा महिन्यांपूर्वी वित्त मंत्री आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठकीत आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांचे मानधन अडीच ते तिप्पट वाढविण्याचे आश्वासन दिले होते. तर जूनमध्ये मंत्रालयावर मोर्चाही काढला होता. मात्र शासनाने अद्यापही निर्णय घेतलेला नाही.

गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविकांना मिळणारे मानधन हे दारिद्ररेषेखालील व किमान वेतनाखालील असून त्यांना वेठबिगारासारखे वागविले जाते. त्यांना अत्यंत तुटपुंज्या मानधनावर काम करावे लागते. त्यामुळे राज्यातील ६४ हजार आशा स्वयंसेविका मानधनवाढीची प्रतीक्षा करत आहेत. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लवकरच जाहीर होणार असल्याने मागण्या तात्काळ मान्य कराव्यात, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशाराही संघटनेने दिला आहे. 

आंदोलनात संघटनेच्या राज्य सचिव सुमन बागुल, तालुकाध्यक्ष सुरेखा खैरनार, गीतांजली काळे, स्नेहल लोखंडे, रोहिणी भामरे, अरुणा ओगले, संध्या अहिरे रंजना खैरनार, वैशाली पवार, योगिता अहिरे, रेशमा साबळे, मनीषा ब्राह्मणकर, ज्योत्स्ना पवार, मोनाली बधान, जयश्री भामरे, कमल चौधरी, चंद्रकला अमृते, सरला जवरे, कृतिका खैरनार, सुनिता चौरे, यमुना गांगुर्डे, वंदना सूर्यवंशी, संगीता चव्हाण, सरला निकुंभ, सुनिता नंदन, छाया चित्ते आदींसह शेकडो आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक सहभागी होत्या. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Silent protest of 'Asha', with black stripes on the mouth to increase honorarium in the exchange