विद्यार्थ्यांनी आपली आवड व कुवत पाहूनच करियर निवडावे : एपीआय खेडकर

प्रा. भगवान जगदाळे
रविवार, 10 फेब्रुवारी 2019

पालकांनी मुलींच्या विवाहाची घाई न करता त्यांना किमान पदवीपर्यंत शिकवण्याचे, विद्यार्थ्यांनी कॉपीमुक्त परीक्षा देऊन यशस्वी होण्याचे, यशाला शॉर्टकट नसून कठोर परिश्रमाशिवाय पर्याय नसल्याचे प्रेरणादायी उद्गारही त्यांनी यावेळी काढले.

निजामपूर-जैताणे (धुळे) : विद्यार्थ्यांनी बारावीनंतर आपली आवड व कुवत पाहूनच करियर निवडावे. केवळ दुसऱ्याचे अनुकरण करून आपली भविष्याची दिशा ठरवू नये, असे प्रतिपादन सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर यांनी केले. आदर्श विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात शनिवारी (ता. 9) दुपारी झालेल्या बारावीच्या निरोप समारंभाप्रसंगी ते विद्यार्थ्यांना संबोधित करत होते. महाविद्यालयाचे अध्यक्ष ऍड. शरदचंद्र शाह अध्यक्षस्थानी होते.

मुख्याध्यापक जयंत भामरे, उपमुख्याध्यापक प्रा.राजेंद्र चौधरी, प्रा. एस. एल. जाधव, प्रा. रामचंद्र सोनजे, प्रा. उपाध्ये आदी व्यासपीठावर उपस्थित होते. बारावीच्या कला, वाणिज्य व विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे प्रातिनिधिक मनोगते व्यक्त केली. विद्यार्थी याप्रसंगी अतिशय भावुक झाले होते. ऍड. शाह, प्रा. जाधव, मुख्याध्यापक भामरे, प्रा. चौधरी, प्रा.सोनजे आदींनीही यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

पुढे बोलताना एपीआय खेडकर यांनी कला शाखेच्या विद्यार्थ्यांना मनात न्यूनगंड न बाळगण्याचे, आवड व कुवत असल्यास स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून त्यांना मोठे अधिकारी होण्याचे, तसेच पालकांनी मुलींच्या विवाहाची घाई न करता त्यांना किमान पदवीपर्यंत शिकवण्याचे, विद्यार्थ्यांनी कॉपीमुक्त परीक्षा देऊन यशस्वी होण्याचे, यशाला शॉर्टकट नसून कठोर परिश्रमाशिवाय पर्याय नसल्याचे प्रेरणादायी उदगारही त्यांनी यावेळी काढले. शेवटी विद्यार्थ्यांना अल्पोपहार वाटप करून कार्यक्रमाचा समारोप झाला. समिती सदस्यांसह शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Students should look after their passion and skills says API khedkar