...चक्क त्याने शहिदांच्या नावाचे ६०१ टॅटू पाठीवर काढले

गायत्री जेऊघाले
शुक्रवार, 4 ऑक्टोबर 2019

शहीद कुटुंबीयांची दुचाकीवरून भेट
आतापर्यंत त्याने उत्तर भारतातील २१५ शहिदांच्या कुटुंबीयांना भेट दिली. भेटीस जाताना तो कुटुंबीयांना देण्यासाठी आवर्जून भेटवस्तू घेत असतो. आपल्या दुचाकीवरून त्याने आतापर्यंत हिमाचल प्रदेश, बिहार, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, पंजाब, केरळ, गुजरात, हरियाना, जम्मू-काश्‍मीर, महाराष्ट्र आदी राज्यांतील शहीद कुटुंबीयांना भेट दिली आहे. बुधवारी (ता. २) त्याने नाशिकमधील १५ कुटुंबांना भेट दिली. या वेळी तेथून त्यांच्या अंगणातील माती आशीर्वाद म्हणून तो सोबत घेत असतो. या मातीतून श्रीनगरमध्ये जगातील सर्वांत मोठे शहीद स्मारक बांधण्याचा मनोदयही त्याने व्यक्त केला. आतापर्यंत १५० शहिदांच्या अंगणातील माती जमविली आहे.

नाशिक - कारगिल व त्यानंतर झालेल्या युद्धांतील शहीद जवानांना मानवंदना देण्यासाठी दिल्लीतील अभिषेक गौतम या ३० वर्षीय तरुणाने चक्क पाठीवर टॅटूद्वारे ६०१ शहिदांची नावे काढली आहेत. या माध्यमातून शहिदांना अनोखी मानवंदना देण्याचा मानस त्याचा आहे. 

त्याच्या या निश्‍चयामुळे वीरांना मानवंदना देणारे चालते-बोलते शहीद स्मारक असेही नाव अनेकांनी त्याला दिले आहे. अभिषेक हा व्यवसायाने इंटिरिअर डिझायनर आहे. २०१७ मध्ये लेह-लडाखला गेला असताना अपघातात सापडलेल्या त्याच्या मित्राला भारतीय सैन्यातील जवानांनी वाचविले होते. त्याच वेळी लष्करासाठी काहीतरी करण्याचे त्याने ठरविले. जुलै २०१८ मध्ये त्याने केवळ ११ दिवसांत कारगिल युद्धातील ५५९ व त्यानंतर आणखी ४२ शहिदांची नावे आपल्या पाठीवर गोंदून घेतली.

शहिदांच्या नावांबरोबरच पाठीवर शिवाजी महाराज, सुभाषचंद्र बोस, महात्मा गांधी, महाराणा प्रताप, राणी लक्ष्मीबाई, भगतसिंग, ए.पी.जे. अब्दुल कलाम, चंद्रशेखर आझाद या महान व्यक्‍तींचीही चित्रे टॅटू स्वरूपात काढली आहेत. 

‘सकाळ’शी बोलताना अभिषेक म्हणाला, की हातात रायफल असूनही दगडांचा मारा झेलणाऱ्या सैनिकांकडून सहनशीलता अवश्‍य शिकावी. सैनिक देशातील दगडावर आणि गुलाबावर सारखेच प्रेम करतात. आपण मात्र जातिधर्माच्या नावाने भांडत बसलो आहोत. जवान आपल्यासाठी उभे आहेत. त्यांच्या कुटुंबीयांसाठी आपण उभे असायला हवे. जवानांनी केलेला त्याग हा सर्वांत मोठा असतो.

इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने सन्मानित
अभिषेकला या उपक्रमाबद्दल इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे. आपल्याला मिळालेला हा पुरस्कार त्याने द्रास येथील कारगिल युद्धातील शहीद कॅप्टन मनोज पांडे यांच्या स्मारकाला समर्पित केला आहे. याचबरोबर २०२० मध्ये गीनिज बुकमध्ये रेकॉर्ड करून तेदेखील शहिदांना समर्पित करण्याचा त्याचा मानस आहे.

शहिदांना मानवंदना देण्यासाठी कितीही केले तरी, ते कमीच राहणार आहे. त्यांच्या परिवारांना भेटून दुःखे समजून घेतो. तेव्हा त्यांचीही मने हलकी होतात. देशातील प्रत्येक शहिदाच्या कुटुंबीयांना मला भेटायचं आहे. 
- अभिषेक गौतम

माझे पती कारगिल युद्धात शहीद झाले होते. बुधवारी अभिषेक गौतम भेटले तेव्हा त्यांच्या पाठीवरील पतीचे नाव बघून अभिमान वाटला. पहिल्यांदा कुणीतरी शहिदांना खरी मानवंदना त्यांना देत आहे.
- रेखा खैरनार, वीरपत्नी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: tattoo on body by abhishek gautam for Martyr slute