
चोरट्यांनी घरात प्रवेश करताना झाडे कापण्यासाठी ठेवलेला कोयता उचलून घरात वृद्ध दांपत्याना धमकावत दागिने घेऊन गेल्याचे सांगण्यात आले.
नवापूर : शहरातील मंगलदास पार्क परिसरात मंगळवारी रात्री तीन ते चारच्या सुमारास दोन घरफोड्या झाल्या. एका घरातून चोरट्यांची निराशा झाली, तर एका घरातून अंदाजित दीड लाखाचे पाच तोळ्याचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केले. याबाबत नवापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
आवर्जून वाचा- दिल्लीत आंदोलन..आणि शेतकऱ्यावर कोणी टरबूज घेता का टरबूज म्हणण्याची वेळ ! -
घरफोडीच्या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
मंगलदास पार्कमधील प्रा. जी. एस. पाटील व माजी नगरसेविका तथा प्रा. विजया जडे या निवृत्त प्राध्यापकांच्या समोरासमोरील दोन्ही घरांत चोरी झाली. प्रा. विजया जडे एक वर्षापासून हैदराबादला वास्तव्यास आहेत. यामुळे त्यांच्या घरात चोरट्यांना काहीच मिळाले नाही.
वृध्द जोडपे गाढ झोपेत
प्रा. पाटील यांच्या खिडकीची लोखंडी ग्रील तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. घरातील तळमजल्यावर वयोवृद्ध जोडपे झोपले होते. बेडरूममध्ये प्रवेश करून ८५ वर्षीय वृद्धाच्या हातातील सोन्याची अंगठी व कपाटातील मंगळसूत्र असे अंदाजित दीड लाखाचे दागिने लंपास केले. चोरट्यांनी घरात प्रवेश करताना झाडे कापण्यासाठी ठेवलेला कोयता उचलून घरात वृद्ध दांपत्याना धमकावत दागिने घेऊन गेल्याचे सांगण्यात आले.
अन पोलिस सायरनचा आवाज
चोरट्यांनी कोणासही इजा पोचवली नसल्याने मोठी दुर्घटना टळल्याचे प्रा. पाटील यांनी सांगितले. गस्तीवर असलेल्या पोलिस वाहनाचा सायरन ऐकल्याने चोरट्याने पळ काढला. पोलिस गस्तीवर असताना, चोरट्यांनी केलेली घरफोडी नवापूर पोलिसांना जणू आव्हान दिल्याचे बोलले जात आहे.
वाचा- जीर्ण दस्तावेज शोधतातय भवितव्याचा आधार ! -
सीसीटीव्ही फुटेजची मदत
पोलिस परिसरातील घराबाहेर लावलेले सीसीटीव्ही फुटेज तपासत असून, लवकरच चोरट्याना जेरबंद करू, असा विश्वास तपास अधिकारी सहाय्यक निरीक्षक धीरज महाजन यांनी व्यक्त केला. याबाबत नवापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
संपादन- भूषण श्रीखंडे