फेसबुकवरून असा सापडला चोर...

सकाळ वृत्तसेवा 
Thursday, 7 November 2019

भद्रकाली गुन्हे शोध पथकाचे पोलिस उपनिरीक्षक व्ही. एस. जोनवाल यांना चोरीतील संशयिताविषयी माहिती मिळाली. त्यांनी त्याच्या फेसबुकवरील अकाउंटची तपासणी केली. त्यात त्याने अंगठी खरेदीसाठी ऑर्डर दिल्याची माहिती समोर आली. पोलिसानी अकाउंटवरूनच त्याचा मोबाईल क्रमांक प्राप्त केला.आणि सापळा रचत त्याला अटक केली.

नाशिक : फेसबुकवर अंगठीची ऑर्डर देणे संशयिताला महाग पडले असून, पोलिसांनी त्याच्या फेसबुक अकाउंटवरून घेतलेल्या माहितीच्या आधारे घरफोडीतील संशयिताच्या मुसक्‍या अवळण्यात यश आले आहे. त्याच्याकडून दोन लाख दहा हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला. 

असा सापडला चोर

द्वारका येथील संत कबीरनगर येथे शुक्रवारी (ता.१) घरफोडी झाली होती. सोने-चांदीचे दागिने तसेच रोकड असा सुमारे तीन लाख २५ हजारांचा ऐवज चोरीला गेला होता. दिनेश कल्याणी (वय २२) यांच्या तक्रारीवरून भद्रकाली पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता. कल्याणी कुटुंबीय नवस फेडण्यासाठी वणीला, तर दिनेश नोकरीवर गेला होता. घर बंद असल्याची संधी साधत संशयिताने घराच्या मागील बाजूची खिडकी तोडून घरात प्रवेश करत चोरी केली. भद्रकाली गुन्हे शोध पथक वरिष्ठ निरीक्षक साजन सोनवणे यांच्या मार्गदर्शनात तपास करत होते. पोलिस उपनिरीक्षक व्ही. एस. जोनवाल यांना चोरीतील संशयिताविषयी माहिती मिळाली. त्यांनी त्याच्या फेसबुकवरील अकाउंटची तपासणी केली. त्यात त्याने अंगठी खरेदीसाठी ऑर्डर दिल्याची माहिती समोर आली. पोलिसानी अकाउंटवरूनच त्याचा मोबाईल क्रमांक प्राप्त केला. त्याचे पार्सल आल्याची माहिती त्याला दिली. शालिमार येथे पार्सल घेण्यासाठी त्यास बोलावले. त्यानुसार पोलिस उपनिरीक्षक जोनवाल, हवालदार सुधीर पाटील, कर्मचारी मोजाड, पवार, गायकवाड, मोरे यांनी बुधवारी (ता.६) सकाळी सापळा रचत त्याला ताब्यात घेतले. चौकशीअंती त्याने चोरीची कबुली दिली.

दोन लाखांवर ऐवज जप्त 

पोलिसांनी त्याच्याकडून एक लाख २० हजारांची रोकड, ४० हजारांची सोन्याची अंगठी, दहा हजारांचे सोन्याचे मंगळसूत्र, दहा हजारांचा हातातील चांदीचा पट्टा, १५ हजारांचा मोबाईल, पाच हजाराची चांदीची पट्टी, दहा हजारांची सोन्याची अंगठी असा सुमारे दोन लाख दहा हजारांचा ऐवज जप्त केला. संशयित कल्याणी कुटुंबीयांच्या ओळखीचा होता. त्यामुळे त्यास घरातील रकमेची माहिती होती. 
 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Thief found on his Facebook account Nashik Crime News