बागलाण तालुक्यात दोन शेतकऱ्यांची आत्महत्या

baglan
baglan

अंबासन - बागलाण तालुक्यात दोन युवा शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणा, शेतमालाला भाव मिळत नसल्याने नैराश्येपोटी आत्महत्या करून जीवन संपविल्याच्या घटना घडल्या असून, जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. तालुक्यातील भडाणे येथील शेतकरी तात्याभाऊ साहेबराव खैरनार यांनी कांदा चाळीत गळफास लावून आत्महत्या केली. तर सारदे येथील शेतकरी मनोज रामराव धोंडगे यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली. 

केंद्र शासन शेतीविषयी चुकीचे धोरण अवलंबत असल्यानेच आत्महत्यांचे प्रमाण वाढले असल्याची चर्चा शेतक-यांकडून केली जात आहे. भडाणे येथील शेतकरी तात्याभाऊ खैरनार (वय४४) यांनी एका बॅकेकडून कर्ज घेतले होते तसेच काही रक्कम हातउसणवार घेतली होती. खैरनार यांनी कांद्याला भाव वाढतील या अपेक्षेने चाळीत तब्बल पाचशे क्किंटलवर कांदा साठवून ठेवला होता. मात्र कृषी उत्पन्न बाजार समितीत अवघ्या शंभर ते दीडशे रूपये भावात कांदा विकला जात असल्याने पुढील कर्ज व देणेकराचे घेतलेले पैसे फेडणार तरी कसे या विवंचनेत ते सापडले होते. कांदा भाव वाढतील म्हणून ते अपेक्षेत होते. परंतू कांद्याचे भाव कोसळतच चालल्याचे पाहून ते हताश झाले होते. गेल्या काही दिवसांपासून नैराश्यच्या गर्तेत सापडलेले तात्याभाऊ खैरनार अस्वथ झाले होते. त्यांनी गुरूवारी (ता.६) रोजी शेतातील कांदा चाळीतच गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. 

दर कमी झाल्यामुळे राज्यात कांदा उत्पादक शेतक-यांची पहिलीच आत्महत्या असल्याचे बोलले जात आहे. तहसीलदार प्रमोद हिले यांनी कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. तात्याभाऊ खैरनार यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली असा परिवार आहे. जायखेडा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली गोरख गर्दे करीत आहेत. 

दुसऱ्या घटनेत सारदे (ता.बागलाण) येथील कर्जबाजारी तरूण शेतकरी मनोज रामराव धोंडगे (वय ३३) यांनी शुक्रवारी (ता.७) रोजी शेतात विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. नातेवाईकांनी त्यांना मालेगाव येथील सामान्य रुग्णालय दाखल केले होते. मात्र प्रतिसाद मिळत नसल्यामुळे शनिवारी (ता.८) रोजी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. एका वर्षापुर्वीच त्यांच्या पत्नी व मुलाचे निधन झाले होते. शेतातील पाण्याच्या नियोजनासाठी धोंडगे यांनी शेततळे तयार केले होते. शेतीत डाळिंब व कांद्याची लागवड केली होती. शेतीपिकांना भाव नसल्याने सात बारा उता-यावरचा बॅक ऑफ महाराष्ट्र या बॅकेचा एकवीस लाखांचा बोजा असून तो कमी कसा करावा या विवंचनेत ते होते. अनेक दिवसांपासून त्यांची चलबिचलता वाढली असल्याचे सांगितले जाते. कर्जाचा वाढता डोंगर आणि घेतलेले कर्ज फेडणार कसे याच नैराश्यातुन त्यांनी विष प्राशन करून आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. जायखेडा पोलिस ठाण्याचे हवालदार दिपक भगत, पंकज खैरनार यांनी घटनास्थळी पंचनामा केला. तहसीलदार प्रमोद हिले यांनीही भेट दिली. जायखेडा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मनोज धोंडगे यांच्या पश्चात एक सहा वर्षांची मुलगी व आई-वडिल असा परिवार आहे.

शेतकऱ्यांची आत्महत्या ही अत्यंत दुःखद घटना आहे. शासन पीडित परिवारांसोबत आहे. यावर्षी जरी पाऊस कमी पडला तरी पुढील वर्षी चांगला पडेल अशी आशा बाळगू. शेतकऱ्यांनो आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नका.
- प्रमोद हिले, तहसीलदार बागलाण.

तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. जनावरांना चारा नाही तसेच विहिरींनीही तळ गाठल्याने पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना वणवण भटकंती करवी लागत आहे. बहुतांश शेतक-यांनी पाण्याअभावी कमी क्षेत्रात कांदा लागवड केली मात्र पाण्याअभावी लागवड केलेला कांदा सोडून देण्याची वेळ कांदा उत्पादनांवर येऊन ठेपली आहे. त्यातच आजमितीला कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी आपल्या जिवाला वैतागले असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. शासनाने शेतक-यांच्या प्रश्नांकडे लक्ष घालण्याची गरज आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com