
डॉक्टरांना भूतलावरील देवदूत मानले जाते. कोरोनाच्या कालावधीत डॉक्टरांनी रुग्णांची केलेली सेवा अवर्णनीय आहे. ही बाब लक्षात घेत येथील श्रध्दास्थान असलेल्या एकमुखी दत्त मंदिराचे दरवाजे कोरोनायोध्दा डॉक्टरांच्या हस्ते उघडण्यात आले.
सारंगखेडा : कोरोनाचे संकट टळो आणि आरोग्यमय राज्य राहो अशी प्रार्थना करत शासनाने दिलेल्या निर्देशानुसार सारंगखेडा ( ता. शहादा ) येथील श्रद्धास्थान असलेल्या एकमुखी दत्त मंदिर भाविकांसाठी सोमवारी ( ता.16 ) खुले करण्यात आले. तत्पूर्वी कोरोना योद्धा ठरलेल्या देवदूत असलेल्या चार डॉक्टरांच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात आले. गेल्या तीन दिवसात दोन हजार भाविकांनी दर्शन घेतले. आज एक तुलाचे नवस फेडण्यात आले.
डॉक्टरांना भूतलावरील देवदूत मानले जाते. कोरोनाच्या कालावधीत डॉक्टरांनी रुग्णांची केलेली सेवा अवर्णनीय आहे. ही बाब लक्षात घेत येथील श्रध्दास्थान असलेल्या एकमुखी दत्त मंदिराचे दरवाजे कोरोनायोध्दा डॉक्टरांच्या हस्ते उघडण्यात आले. त्यांच्या हस्ते विडा अवसर पूजन करण्यात आले. इडा पीडा टळो बळीचे राज्य येवो, अशी प्रार्थना बली प्रतिपदेला केली जाते. कोरोनाचे संकट टळो आणि आरोग्यमय राज्य राहो, अशी प्रार्थना करत शासनाने दिलेल्या निर्देशानुसार येथील मंदिर उघडण्यात आले. यावेळी मंदिराबाहेर फटाक्याची आतिषबाजी करत आनंद व्यक्त केला. गेल्या तीन दिवसात दोन हजार भाविकांनी दर्शन घेतले. दर्शनासाठी बॅरीकेट्स लावण्यात आले असून रांगेत तीन फुट अंतर ठेऊन टप्प्याटप्यात भाविकांना सोडण्यात येत आहे. मास्क लावूनच दर्शनाला परवानगी दिली आहे.
कोरोना योध्दांचा सन्मान
कोरोना हे नाव ऐकले तरी थरकाप होतो. अशी परिस्थिती असतांना शहरामध्ये डॉक्टरांनी रुग्णालये बंद केली. अशा स्थितीत कोरोनाकाळात येथील चार डॉक्टरानी आपल्या परिसरातील रुग्णांवर रात्र, दिवस उपचार केले. कोरोनाची भिती कमी केली. त्या डॉक्टरांचा दत्त विश्वस्थांनी सन्मान केला. डॉ. सुभाष फुलंब्रीकर, डॉ.ओंकार पाटील, डॉ. फिरोज शहादा, प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यानिक अधिकारी सी.एम. पाटील, प्रदिप कोळी यांचा चेतक फेस्टिव्हल समितीचे अध्यक्ष जयपालसिंह रावल यांचा हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी विश्वस्थ अध्यक्ष अर्जून पाटील, रविंद्र पाटील, भिक्कन पाटील, अंबालाल पाटील, नरोत्तम पाटील, छोटू पाटील, अरुण पाटील आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन जितेंद्र गिरासे यांनी केले तर आभार पुरुषोत्तम आगळे यांनी मानले.
दोन हजार भाविकांनी घेतले दर्शन
आठ महिन्यापासून बंद असलेले येथील श्रध्दास्थान असलेले मंदिर ( ता. 16 ) सकाळी नऊ वाजता उघडण्यात आले. तीन दिवसात दोन हजाराहून अधिक भाविकांनी दर्शन घेतले. येथील दत्त प्रभू नवसाला पावतो अशी श्रध्दा असून आज सकाळी एका भाविकाचे केळीची तुलाचे नवस फेडण्यात आले असल्याचे नंदूरबार जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जयपालसिंह रावल म्हणाले.