अनुसूचित जातीचा दर्जा आणि शिक्षणासाठी सवलती; वडार समाजाची मागणी

दगाजी देवरे
सोमवार, 30 जुलै 2018

देशातील इतर दहा राज्यात संविधानाप्रमाणे दिला जाणारा अनुसूचित जातीचा दर्जा महाराष्ट्रातील वडार समाजालाही मिळावा, अशी या समाजाची मागणी आहे. ओड (वडार) कम्युनिटी कौन्सिल ऑफ इंडियाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंत गुंजाळ यांनी मांडली आहे.

म्हसदी : भटकंती करणाऱ्यांसाठी शासनाच्या अनेक योजना असल्या तरी धुळे- नंदुरबार जिल्ह्यात वडार समाज अजूनही त्याच्या लाभापासून वंचित आहे. देशातील इतर दहा राज्यात संविधानाप्रमाणे दिला जाणारा अनुसूचित जातीचा दर्जा महाराष्ट्रातील वडार समाजालाही मिळावा, अशी या समाजाची मागणी आहे. ओड (वडार) कम्युनिटी कौन्सिल ऑफ इंडियाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंत गुंजाळ यांनी मांडली आहे.

समाजाची राज्यातील लोकसंख्या 55 लाख एवढी आहे. त्यात धुळे जिल्ह्यात 25 व नंदुरबार जिल्ह्यात 32, तर जळगाव जिल्ह्यात 51 हजार एवढी असून शिक्षणापासून दूर असल्याने मागासलेपण सर्वाधिक आहे. शिक्षण हक्क कायद्यानुसार प्रत्येकाला शिक्षण मिळावे, यासाठी शासन प्रयत्न करीत असेल तरी वडार समाज आजही या सवलतींपासून वंचित राहत आहे. समाजातील काही शिकलेले लोक शिक्षणाबाबत आग्रह धरत आहेत, पण पुढे सवलती नसल्याने समाज पुन्हा मागे पडत आहे.

देशातील दहा राज्यांत ओड (वडार) समाजाला अनुसूचित जातींचा दर्जा देण्यात आला आहे; परंतु महाराष्ट्रातील या समाजाला तो दर्जा नाही. राज्यभरात वडार समाजाच्या संघटना त्यासाठी संघर्ष करत आहेत. शासनाच्या वसंतराव नाईक महामंडळाचे अनुदान नाही. वसतिगृह व आश्रमशाळा असून नसल्यासारख्या आहेत.

भाषा, गोत्र देशभरात एकच
देशभर विखुरलेल्या वडार समाजाची भाषा आणि गोत्र एकच आहे. देशात वडार समाजाला वडार, बोवी, बोयर, बुरगुंडा, बंडी वड्डार, वढाय, राजपूत ओड, ओड बेलदार, नोनवा, सिरकीबंद आदी नावाने ओळखले जाते. कर्नाटक, आंध्र, सिक्कीम, मध्य प्रदेश, हरियाना, पंजाब, दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, उत्तराखंड या राज्यात एससी, एसटीचा दर्जा मिळाला आहे. महाराष्ट्रात
हा अधिकारी मिळावा म्हणून समाजाची मागणी आहे. भाषा आणि गंगागण, शिवगण गोत्र एकच असल्याने रितिरिवाजाप्रमाणे विवाह एकाच पद्धतीचे होतात.

शैक्षणिक प्रगती कासवगतीने!
वडार समाजातील मोजकेच तरुण उच्चशिक्षित आहेत. केवळ दहावी-बारावीनंतर आर्थिक परिस्थितीअभावी पुढील शिक्षण घेता येत नाही. कमी वयात विवाह करण्याची काही प्रमाणात आजही परंपरा आहे. भटक्‍या विमुक्त जातीत समावेश असल्याने शासनाचा अपवाद म्हणून काही सुविधांचा लाभ घेत किंवा स्वतःच्या मेहनतीने शिक्षण घेतले जाते. इतर राज्यांप्रमाणे वडार समाजाला एससी, एसटीचा दर्जा मिळाला, तर शिक्षणाची कासवगतीची प्रगती लवकर होऊ शकते.

भटकंती करणाऱ्या वडार(ओड) समाजही प्रवाहात सामील होऊ पाहात आहे, मात्र शिक्षणासाठी सवलती नसल्याने आर्थिक स्थितीअभावी तो पुढे येऊ शकत नाही. वडार समाजासाठी स्वतंत्र विकास महामंडळ मिळावे. समाजाचा एससी-एसटीत समावेश केला, तरच प्रगती होईल. - वसंतराव गुंजाळ, राष्ट्रीय उपाध्यक्ष, ओड (वडार) कम्युनिटी कौन्सिल ऑफ इंडिया

Web Title: Vadar community demands for Scheduled Caste Status and Education Concessions