Vidhansabha 2019 : युती, आघाडी नसल्यास सर्वत्र बंडखोरी

बळवंत बोरसे
बुधवार, 22 मे 2019

असा आहे राजकीय पट

  • युती आणि आघाडी कायम राहिली, तरी बंडखोरी अटळ.
  • लोकसभेच्या निकालानंतर काँग्रेस-भाजपमध्ये फुटीची शक्‍यता.
  • अक्कलकुवा, साक्रीमध्ये युतीत जागा बदलाची शक्‍यता

नंदुरबार लोकसभा मतदारसंघात नंदुरबार, शहादा, अक्कलकुवा, नवापूर, साक्री आणि शिरपूर असे सहा विधानसभा मतदारसंघ येतात. मतदारसंघ अनुसूचित जमातीसाठी (एसटी) राखीव आहेत. लोकसभा निवडणुकी वेळची युती आणि आघाडी कायम राहिल्यास शिरपूर वगळता चारही मतदारसंघांत मोठ्या प्रमाणावर बंडखोरीची शक्‍यता आहे, त्याची चुणूक लोकसभा निवडणुकी वेळी दिसली आहे.

नंदुरबार विधानसभा मतदारसंघात भाजपतर्फे गेल्या वेळी डॉ. विजयकुमार गावित निवडून आले. काँग्रेसचे कुणाल वसावेंनी जोरदार टक्कर दिली होती. यंदाही उभयतांतच रंगेल, असे चित्र आहे. मात्र, भाजपचे सुहास नटावदकर किंवा त्यांच्या पत्नी सुहासिनी अपक्ष लढण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे विजयाची समिकरणे बदलू शकतात. नवापूरमध्ये लोकसभेच्या उमेदवारीवरून झालेले नाट्य पाहता येथे बंडखोरी अटळ आहे. भरत गावित यांना विधानसभा निवडणुकीत उमेदवारीचे आश्वासन पक्षश्रेष्ठींनी देऊन बंडखोरी जेमतेम टाळली. मात्र, आता पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतात, यावर चित्र असेल. काँग्रेसकडून शिरीष नाईक आणि भरत गावित इच्छुक आहेत.

भरत गावित आपल्या निर्णयावर सद्यःस्थितीत ठाम आहेत. दोन्ही युवक नेते आणि ज्येष्ठ नेते यांनी तिढा सोडवला तरच मार्ग निघेल, अन्यथा बंडखोरी ठरलेली आहे.

साक्री मतदारसंघ आघाडीत काँग्रेसकडे, तर युतीत भाजपकडे आहे. गेल्या वेळी काँग्रेसच्या डी. एस. अहिरेंनी निसटता विजय मिळवला. भाजपच्या मंजुळा गावितांचा अवघ्या ३३०० मतांनी पराभव झाला होता. यंदा पुन्हा त्या स्पर्धेत असतील. शिवाय भाजप आदिवासी आघाडीचे मोहन सूर्यवंशी हेही प्रबळ दावेदार राहतील. भाजपसोबत शिवसेनाही साक्री मतदारसंघावर दावा करू शकते. शिवसेनेकडून रोहोडचे सरपंच हिम्मत साबळे यांच्यासोबतच आणखीन दोघे-तिघे इच्छुक आहेत. 

शहाद्यामध्ये भाजपकडून उदेसिंग पाडवी, काँग्रेसकडून पद्माकर वळवी, तर राष्ट्रवादीकडून राजेंद्रकुमार गावित यांच्यात प्रमुख लढत झाली, अत्यंत कमी मताधिक्‍याने पाडवी निवडून आले. यंदा मात्र त्यांना लढत तेवढी सोपी नाही. लोकसभेच्या निकालावरच येथील उमेदवारी निश्‍चित होईल. अक्कलकुवा-धडगावात भाजपतर्फे माजी जिल्हाध्यक्ष नागेश पाडवी, शिवसेनेतर्फे जिल्हाप्रमुख आमशा पाडवी उमेदवार असतील. शिवसेनेने दावा केल्यास भाजपतर्फे बंडखोरीची शक्‍यता आहे. ‘मनसे’तर्फे सेवानिवृत्त अप्पर जिल्हा पोलिस अधीक्षक किसन पवार उमेदवारी करतील.

शिरपूर तालुक्‍यात लोकसभेत भाजपने आघाडी घेतल्यास विधानसभेचे चित्र बदलू शकते. भाजपचे डॉ. जितेंद्र ठाकूर, आदिवासी आघाडीचे जिल्हाध्यक्ष रमेश वसावे इच्छुक आहेत. गेल्या वेळी डॉ. ठाकूरांनी ७२ हजारांवर मते मिळवली होती. हा काँग्रेसविरोधातील मतांचा उच्चांक आहे. पराभवानंतरही ते कमालीचे सक्रिय आहेत. काँग्रेसतर्फे पावरा यांना उमेदवारी निश्‍चित मानली जाते.

असे आहेत पक्षनिहाय इच्छुक
काँग्रेस - आमदार सुरूपसिंग नाईक, शिरीषकुमार नाईक, भरत गावित, पद्माकर वळवी, काशीराम पावरा, डी. एस. अहिरे, कुणाल वसावे, गणपत चौरे, बापू चौरे, संजय ठाकरे. के. सी. पाडवी, विजय पराडके, विक्रम पाडवी, रतन पाडवी.

भाजप - डॉ. विजयकुमार गावित, उदेसिंग पाडवी, डॉ. जितेंद्र ठाकूर, नागेश पाडवी, अनिल वसावे, डॉ. सुप्रिया विजयकुमार गावित, माजी आमदार शरद गावित, रमेश वसावे.

राष्ट्रवादी काँग्रेस - राजेंद्रकुमार गावित

शिवसेना - आमश्‍या पाडवी, हिंमत साबळे (साक्री).


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhansabha Election 2019 Nandurbar Constituency Yuti Aghadi Rebel Politics