कौळाण्यात रॉकेलपेक्षा पाणी महाग

प्रमोद सांवत
शनिवार, 18 मे 2019

एक हंडा पाण्यासाठी कुटुंबातील दोघा-तिघांना जावे लागते. तेव्हा कुठे एखाद्या विहिरीतून दोन- तीन बादल्या काढल्यानंतर एक हंडाभर पाणी मिळते. तेही वाया जाऊ नये म्हणून महिला शिबल, मग, हंडा, बादली असे साहित्य घेऊन पाण्यासाठी जातात.

कौळाणे (जि. नाशिक) - एक हंडा पाण्यासाठी कुटुंबातील दोघा-तिघांना जावे लागते. तेव्हा कुठे एखाद्या विहिरीतून दोन- तीन बादल्या काढल्यानंतर एक हंडाभर पाणी मिळते. तेही वाया जाऊ नये म्हणून महिला शिबल, मग, हंडा, बादली असे साहित्य घेऊन पाण्यासाठी जातात. पिण्याच्या दोनशे लिटर पाण्यासाठी शंभर रुपये, तर वापराच्या पाण्यासाठी ५० रुपये मोजावे लागतात. खिशात दमडी नाही अन्‌ पिण्याच्या पाण्यावर खर्च सुरू झाला आहे हे दृष्य आहे ते कौळाणे गावाचे. 

टंचाईमुळे पै-पाहुण्यांनी पाठ फिरविली, पशुधनाची विक्री झाली. विहिरीतून शेंदलेल्या पाण्याचा थेंबही वाया जाऊ नये, यासाठी कौळाणे येथे उज्ज्वला देसाई या शिबल लावून ड्रममध्ये मगने पाणी ओतत होत्या. रॉकेलपेक्षा पाणी महाग झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. निमगाव व परिसरातील कौळाणे, वऱ्हाणे पाडा, वऱ्हाणे, मेहुणे, निमगाव, ज्वार्डी या गावांमध्ये भेटी दिल्यानंतर दुष्काळाची दाहकता जाणवली. नांदगावसह ५६ खेडी पाणीपुरवठा योजनेचे पाणी २० ते २५ दिवसाआड येते. ही योजना निकामी असल्याचे दीपक गायकवाड यांनी सांगितले. 

कौळाणे येथे गावाला दोन व वाडी, वस्तीला एक अशा तीन टॅंकरद्वारे पाणीपुरवठा होतो. तीन हजार लोकवस्तीच्या गावात प्रत्येकाला १२ लिटर पाणी मिळते. ते कोणाला पुरणार? असा सवाल ग्रामपंचायत सदस्य रमेश सावंत यांनी केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Water Expensive than kerosene Water Shortage