Biogas Project : बायोगॅस प्रकल्पाच्या कामाला अखेर लाभले मुहूर्त; सिव्हिल वर्कसाठी खोदकामाला प्रारंभ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Excavation in progress with JCB for biogas plant at municipal site on Varkhedi Road.

Biogas Project : बायोगॅस प्रकल्पाच्या कामाला अखेर लाभले मुहूर्त; सिव्हिल वर्कसाठी खोदकामाला प्रारंभ

धुळे : स्वच्छ भारत अभियानांतर्गत तब्बल १२ कोटी रुपये खर्चातून उभारण्यात येणाऱ्या बायोगॅस प्रकल्पाचे काम अखेर सुरू झाले. २७ डिसेंबर २०२२ ला स्थायी समितीने बायोगॅस प्रकल्प उभारणीचे काम मे. एव्हनी एंटरप्रायजेसला देण्यास मंजुरी दिली होती.

मार्च-२०२३ अखेर हा प्रकल्प उभा राहील, असा अधिकाऱ्यांनी विश्‍वास व्यक्त केला होता. मात्र, मार्च निम्म्यावर आला असताना या कामाची सुरवातच झाली आहे. असो, किमान काम सुरू झाल्याने प्रकल्पही लवकर मार्गी लागेल, अशी अपेक्षा असणार आहे. (work of biogas project finally got moment Commencement of excavation for civil works dhule news)

स्वच्छ भारत अभियानांतर्गत धुळे शहरासाठी मंजूर घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पांतर्गत विविध कामांचा समावेश आहे. यात बायोगॅस प्रकल्प या महत्त्वपूर्ण प्रकल्पाचाही समावेश आहे. या प्रकल्पाचे काम एव्हाना कधीच मार्गी लागणे अपेक्षित होते. मात्र हे काम रखडले.

दरम्यान, नव्याने या प्रकल्पाच्या कामासाठी अधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला. स्वच्छ सर्वेक्षण-२०२३ अंतर्गत विविध कामांना गती देण्याचा प्रयत्न झाला. त्यातही विशेषतः मार्चअखेर निधी परत जाऊ नये यासाठी आवश्‍यक कार्यवाही पूर्ण करण्यात आली.

९ डिसेंबरला बायोगॅस प्रकल्पाचा विषय स्थायीपुढे आला होता. मात्र, प्रकल्पाबाबत माहिती देणारे अधिकारीच सभेला उपस्थित नसल्याचे कारण देत हा विषय तहकूब करण्यात आला होता. त्यानंतर २८ डिसेंबरला पुन्हा स्थायी समितीपुढे विषय आला व समितीने विषय मंजूर केला.

एकूण ११ कोटी ८४ लाख ८८ हजार ८५७ रुपये खर्चाच्या या प्रकल्पाचे काम मे. एव्हनी एंटरप्रायजेसला मिळाले. दरम्यान, २९ डिसेंबरला नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली.

त्यामुळे हा प्रकल्प पुन्हा किमान महिनाभर अडकण्याची भीती व्यक्त झाली. मात्र, आचारसंहिता लागण्यापूर्वीच कार्यादेश देण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. शिवाय मार्च २०२३ अखेर हा प्रकल्प पूर्ण करण्याचा मानसही व्यक्त करण्यात आला होता. प्रत्यक्षात प्रकल्पाचे काम दोन दिवसांपूर्वीच सुरू झाले आहे.

हेही वाचा : देशातले ३२ म्युच्युअल फंडांचं व्यवस्थापन आहे महिलांच्या हाती...

खोदकामाला सुरवात

प्रकल्पांतर्गत सिव्हिल वर्क होणार आहे. यासाठी दोन दिवसांपूर्वीच खोदकाम सुरू करण्यात आले. कंत्राटदाराला कार्यादेश दिल्यानंतर वरखेडी रोडवरील महापालिकेच्या जागेवर सपाटीकरणाचे काम झाले. त्यानंतर जेसीबीच्या सहाय्याने खोदकाम करण्यात येत आहे. सिव्हिल वर्कसाठी दोन-अडीच महिने लागण्याची शक्यता आहे.

तीस टीडीपी क्षमता

बायोगॅस प्रकल्प ३० टीडीपी क्षमतेचा आहे. या प्रकल्पासाठी आवश्‍यक ओला कचरा (रॉ मटेरिअल) उपलब्धतेनुसार बायोगॅस निर्मिती होणार आहे. २०४६ ची लोकसंख्या गृहीत धरून ३० टीडीपी क्षमतेच्या प्रकल्पासाठी १५०-२०० टन ओला कचऱ्याची गरज भासणार आहे.

सद्यःस्थितीत सुमारे १०० टन कचरा उपलब्ध होतो. दरम्यान, कमी प्रमाणात ओला कचरा उपलब्ध झाल्यास तेवढ्या कचऱ्यावरही बायोगॅस निर्मिती सुरू राहावी यासाठी महापालिकेने ३० टीडीपी क्षमतेच्या प्रकल्पाचे प्रत्येकी १० टीडीपी क्षमतेचे तीन भाग उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार हे काम करण्यात येणार आहे.