
उत्तर प्रदेशमध्ये विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे.
निवडणुकीपूर्वीच समाजवादी पक्षाला धक्का; भाजपच्या 9 आमदारांची बिनविरोध निवड
उत्तर प्रदेशमध्ये विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी (UP Legislative Council Election) आज मतदान होत असून 27 जागांसाठी आज निवडणूक होणार आहे. राज्यात एकूण 36 MLC च्या जागा आहेत, त्यापैकी 27 जागांवर निवडणूक होणार आहे. कारण, 9 जागांवर उमेदवार आधीच बिनविरोध विजयी झाले आहेत. हे सर्व विजयी उमेदवार भाजपचे (BJP) असून निवडणुकीपूर्वीच भाजपनं सभागृहात आपलं संख्याबळ वाढवलंय. मात्र, समाजवादी पक्ष (SP) राज्यातील सर्व 27 जागा लढवत आहे. दरम्यान, राज्यातील नऊ जागांसाठी आज मतदान होणार नाहीय. कारण, या जागा भाजपच्या उमेदवारांनी बिनविरोध जिंकल्या आहेत. यामध्ये मिर्झापूर-सोनभद्रसह लखीमपूरची जागाही आहे.
मिर्झापूर सोनभद्र : या जागेवरून श्याम नारायण सिंह उर्फ विनीत सिंह हे बिनविरोध आमदार म्हणून निवडून आलेत. कारण, समाजवादी पक्षाचे उमेदवार रमेश सिंह यादव यांनी शेवटच्या क्षणी आपलं नाव मागं घेतलं. तर, उमेदवारी अर्ज छाननीनंतर अपक्ष उमेदवार प्रेमचंद यांचा उमेदवारी अर्ज नामनिर्देशनपत्रातील त्रुटींमुळं फेटाळण्यात आला. त्यानंतर भाजपचे उमेदवार श्याम नारायण यांची बिनविरोध निवड झाली.
अलीगड-हाथरस : पश्चिम उत्तर प्रदेशातील अलिगढ-हाथरस मतदारसंघातून भाजपचे चौधरी शिवपाल सिंह बिनविरोध निवडून आले आहेत. वास्तविक, समाजवादी पक्षाकडून जसवंत सिंह यादव यांनी या जागेवरून उमेदवारी दाखल केली होती. परंतु, त्यांच्या तीन प्रस्तावकांना भाजप नेत्यांनी आक्षेप घेतला आणि नंतर सपा उमेदवार आणि आमदार जसवंत सिंह यादव यांचा अर्ज रद्द करण्यात आला.
एटा आणि मथुरा सीट : एटा-कासगंज-मैनपुरी आणि मथुरा या चार जिल्ह्यांसह दोन आमदार निवडून आले आहेत. यामध्ये एटामधून आशिष यादव आणि मथुरामधून ओमप्रकाश सिंह बिनविरोध निवडून आले आहेत. हे दोघंही भाजपचे उमेदवार आहेत. सपानं उदयवीर सिंह आणि राकेश यादव यांना मथुरामधून उमेदवारी दिली होती. मात्र, तांत्रिक बिघाडामुळं सपाच्या दोन्ही उमेदवारांचे अर्ज रद्द केले.
बदायूं : यासोबतच बदायूंमधून भाजपचे बागीश पाठक बिनविरोध निवडून आले आहेत. कारण, या जागेवरून सपाचे उमेदवार सिनोद कुमार शाक्य यांनी आपलं नाव मागं घेतलं होतं.
बांदा : राज्यात भाजपचे उमेदवार बिनविरोध विजयी झालेल्या नऊ जागांमध्ये बांदा ही जागाही आहे. बांदा-हमीरपूर एमएलसी निवडणुकीत भाजपनं जितेंद्र सिंह सेंगर यांना उमेदवार म्हणून घोषित केलं होतं आणि 5 उमेदवारांचे अर्ज फेटाळण्यात आले होते. त्यानंतर इथं भाजपचा मार्ग सुकर झाला.
हरदोई जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषदेच्या जागेसाठी भाजपचे उमेदवार अशोक अग्रवाल यांची बिनविरोध निवड झालीय. तर बुलंदशहर-गौतम बुद्ध नगर विधानपरिषदेच्या जागेवरही भाजपचा उमेदवार बिनविरोध विजयी झाला आहे. इथं भाजपनं नरेंद्र भाटी यांना तिकीट दिलं होतं. शिवाय, लखीमपूर-खेरीमध्ये भाजपचे अनूप गुप्ता यांची एमएलसी पदावर बिनविरोध निवड झालीय. अनूप गुप्ता हे भाजपचे प्रदेश सरचिटणीस आहेत.