उत्तर प्रदेश : रिपब्लिकनशी युती भाजपला तारणार! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 Ramdas Athawale

रिपब्लिकनशी युती भाजपला तारणार!

गोरखपूर: उत्तर प्रदेशातील पूर्वांचलमध्ये भारतीय जनता पक्ष मोठा जोर लावत असला, तरी पक्षाला स्पष्ट बहुमतासाठी संघर्ष करावा लागत आहे. या परिस्थितीत रिपब्लिकन पक्ष (आठवले गट) भाजपला तारू शकेल, अशी चर्चा असून, त्याला पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी दुजोरा दिला आहे.

आठवले म्हणाले, ‘‘उत्तर प्रदेशात दलित मतांची संख्या वीस टक्क्यांहून अधिक आहे. मायावती सक्रिय नसल्याने हे मतदार संभ्रमात आहेत. या परिस्थितीत आमच्या पक्षाने भाजपला पाठिंबा दिला असल्याने ही मते भाजपच्या पारड्यात जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या अनेक जागा एक ते दोन हजार मतांनी गेल्या, तशी स्थिती उद्‍भवणार नाही.’’

ओवेसी फॅक्टरबाबत विचारले असता आठवले यांनी, ‘ओवेसींचा फारसा प्रभाव पडणार नाही व त्याचा फायदा अखिलेश यादव यांना होईल, असे मत व्यक्त केले. दरम्यान, गोरखपूरच्या विद्यापीठातील तरुण राज्यात भाजपची स्थिती चांगली असल्याचे सांगतात. पक्षाने विकासाची कामे केली असली तरी योगींना स्पष्ट बहुमतासाठी संघर्ष करावा लागेल, असाही त्यांच्या चर्चेचा सूर होता. विरू उपाध्याय हा राज्यशास्त्राचा विद्यार्थी म्हणाला, ‘‘मागील सरकारच्या तुलनेत योगींनी केलेले काम खूपच उजवे आहे. त्यांनी शिक्षणासाठी अनेक योजना राबवल्या. जातिवाद व गुंडगिरी रोखण्यात त्यांनी सप सरकारपेक्षा अधिक चांगले काम केले व त्यामुळेच त्यांना मोठा पाठिंबा मिळत आहे.’’

‘सर्व सूत्रे अधिकाऱ्यांकडेच’

विद्यार्थी नेता व पत्रकारितेचा विद्यार्थी संजीव त्रिपाठीने ही निवडणूक भाजपला जड जाणार असल्याचे सांगितले. योगींनी आमदारांचे महत्त्व कमी केले व फक्त प्रशासनातील अधिकाऱ्यांवरच सर्व कारभार सोपवल्याने त्यांच्याबद्दल नाराजी आहे, असे त्याने स्पष्ट केले.