उत्तरप्रदेश : विरोधकांना हवाय माझा शेवट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pm narndra modi

उत्तरप्रदेश : विरोधकांना हवाय माझा शेवट

वाराणसी: उत्तरप्रदेश प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वाराणसीतून पुन्हा विरोधकांवर निशाणा साधला. येथेच विरोधकांनी माझ्या मृत्यूसाठी प्रार्थना केली होती असे त्यांनी म्हटले आहे.

‘‘राजकारणामध्ये काही मंडळी किती खालच्या पातळीवर उतरू शकतात? हे आपण पाहिले पण जेव्हा त्यांनी काशीमध्ये माझ्या मृत्यूसाठी प्रार्थना केली तेव्हा मात्र मला आनंद झाला. याचाच दुसरा अर्थ असा होता की मरेपर्यंत मी काशीला सोडणार नाही आणि येथील लोकही मला अंतर देणार नाहीत.’’ असे मोदी यांनी नमूद केले. ते येथे विजय बूथ संमेलनामध्ये बोलत होते. मोदींनी यावेळी समाजवादी पक्षावर देखील निशाणा साधला. मोदी म्हणाले, ‘‘ मी व्यक्तीशः कुणावरही टीका करत नाही तशी टीका करणेही मला आवडत नाही. पण काही मंडळीनी याच काशीमध्ये माझ्या मृत्यूची जाहीर प्रार्थना केली होती. खरे तर त्याच वेळी मी निश्चिंत झालो होतो. यामुळे काशिवासीयांचे प्रेम देखील अधोरेखित झाले.’’

अखिलेश यादव यांनी मोदींवर निशाणा साधताना शेवट जवळ आला की प्रत्येकाला काशीमध्येच राहावे लागते असा टोमणा मारला होता. भाजपचा कार्यकर्ता हा देशासाठी काम करतो. आम्हा सर्वांसाठी पक्षापेक्षाही देश महत्त्वाचा आहे. आम्ही निवडणुकांबरोबरच लोकांची मने देखील जिंकतो असे मोदी यांनी सांगितले. आजच्या दौऱ्यामध्ये पंतप्रधान मोदींनी काशी

विश्वनाथ मंदिराला भेट देत तिथे प्रार्थनाही केली.

भारताला शक्तिशाली व्हावे लागेल

महाराजगंज येथेही पंतप्रधानांची सभा पार पडली. आंतरराष्ट्रीय पातळीवर निर्माण होत असलेली आव्हाने लक्षात घेतली तर भारताला अधिक शक्तिशाली व्हावे लागेल असे सांगतानाच त्यांनी या आव्हानांचा प्रत्येक भारतीय नागरिकावर परिणाम होत असल्याचे नमूद केले. देशाला शक्तिशाली बनविण्यात उत्तरप्रदेशची मोठी भूमिका आहे. सीमावर्ती भागातील आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने ‘व्हायब्रंट व्हिलेज’ ही योजना सुरू केली असल्याचे त्यांनी सांगितले. जग आजमितीस मोठ्या आव्हानांना सामोरे जाते आहे आणि यापासून कुणीही दूर राहिलेले नाही. जगातील प्रत्येक नागरिकावर याचा काही ना काहीतरी परिणाम होतो आहे. अशा स्थितीमध्ये आपल्याला भक्कम भारत घडविणे नितांत गरजेचे आहे. कृषीपासून लष्करापर्यंत, समुद्रापासून अंतराळापर्यंत प्रत्येक क्षेत्रामध्ये भारताला आगेकूच करावी लागेल. देशातील एक मोठे राज्य म्हणून उत्तर प्रदेशवर मोठी जबाबदारी असल्याचे मोदींनी नमूद केले.