
UP Election: यादवांच्या एकजुटींमुळे भाजपने बदलला प्रचाराचा ‘गोलपोस्ट’
नवी दिल्ली : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी १६ जिल्ह्यांतील ५९ जागांसाठी रविवारी (ता.२०) मतदान होत आहे. आतापावेतो ध्रुवीकरण आणि जिन्ना, अब्बाजान, चाचा जान आदी ‘कोड वर्ड'चा मारा असलेल्या प्रचाराचा सूर या टप्प्यावर येता येता बदलला. आता घराणेशाहीच्या पीचवर कथित दहशतवाद्यांच्या संबंधाबाबत भाजपच्या मुलूखमैदान तोफांचा मारा सुरू झाला. अर्थात उत्तर प्रदेश निवडणुकीत- ‘आवाज कोणाचा, याचा कल’ हेच पहिले तीन टप्पे व त्यातील १७२ जागा ठरवतात, असा इतिहास आहे. त्यातही तिसरा टप्पा जास्त महत्वाचा खासकरून. (Uttarpradesh Assembly Election 2022 Updates)
२०१७ मध्ये प्रथमच उत्तर प्रदेशात स्पष्ट बहुमत मिळवताना भाजपने याच पहिल्या तिन्ही टप्प्यांत तब्बल १४० जागा जिंकून गेल्या तीन दशकांतील ऐतिहासिक कामगिरी केली होती. यंदा ती राखण्याचे आव्हान भाजपसाठी अशक्यप्राय असल्याचे मानले जाते, त्यामागे यादवांची एकजूट आहे. यापुढच्याही किमान १००-१५० जागांवर याच तिसऱ्या टप्प्याची हवा प्रभाव पाडते, असे मानले जाते. भाजपने प्रचाराचा गोल पोस्ट बदलला, त्यामागचे हे ठळक कारण. यादव बेल्ट असलेल्या व यादवबहुल लोकसंख्येला मुस्लिम मतांची जोड असलेल्या या भागात ध्रुवीकरणाकडून घराणेशाहीकडे असा प्रचाराचा लंबक कलला आहे. यंदा एकजूट झालेले-यदुकुल हे याचे कारण आहे.
२०१७ मध्ये अखिलेश-रामगोपाल यादवांविरुद्ध शिवपाल यादव अशी फाटाफूट झाल्याने भाजपच्या वावटळीत दैना उडालेल्या समाजवादी पक्षात यावेळी यादव काका पुतणे एकत्र आले आहेत. मुलायमसिंह व शिवपाल यादव यांच्यासह अखिलेश यांनी नुकतीच येथे एकजुट दाखवली.
मुलायमसिंह परिवारात, यादवांमध्ये फाटाफूट झाल्यानेच २०१७ मध्ये भाजपने या पट्ट्यातही सपची ‘बँड बाजा बारात' काढली होती. यादवबहुल २८ पैकी फक्त ६ जागांवर सपची ऐतिहासिक घसरण झाली होती. २०१२ च्या निवडणुकीत ‘सप’ने येथेच २८ पैकी २६ जागांचे भरघोस पीक काढले होते. या जागांवर यादवांची २० टक्के मते (एकजूट असली तर) निर्णायक ठरतात. त्याच्या जोडीला या २८ पैकी २२ जागांवरील तेवढ्याच २० टक्के मुस्लिम लोकसंख्येलाही हातचे धरणाराच येथे बाजी मारतो हे स्पष्ट आहे.
तिसऱ्या टप्प्यात अखिलेश यादव यांचा करहल मतदारसंघ येतो. करहलबरोबर मुलायमसिंह यादव यांचे खास नाते आहे. त्यामुळेच अखिलेश यांनी आझमगड सोडून चातुर्याने करहलची निवड केली. भाजपने त्यांच्यासमोर केंद्रीय मंत्री एस. पी. सिंह बघेल यांना उभे केले आहे काँग्रेसने येथे उमेदवार दिलेला नाही. सप राजवटीतील गुंडगिरी हा भाजपच्या प्रचाराचा- यूएसपी येथेही दिसतो. भाजपने अखिलेश यांच्यावर दहशतवाद्यांशी संबंध असल्याचाही आरोप केला आहे. करहलमध्ये भाजप जिंकला की यूपीतून सप हद्दपार होईल हा शहा यांचा आडाखा. यादवांच्या या गडात २०१७ मध्ये भाजपने ५९ पैकी ४९ जागा हिसकावल्या होत्या तर अखिलेश यांच्या पारड्यात केवळ ८ जागा पडल्या होत्या. मुलायमसिंह कुटुंबाची एकजूट ही भाजपच्या चिंतेचा विषय ठरला हे उघड आहे.
अखिलेश यांच्यामुळे मनोबल वाढले
भाजपच्या प्रचारतोफा आता फक्त एकाच शब्दावर हल्ला करत आहेत व तो शब्द आहे, यादवांची घराणेशाही! मोदी यांनी अखिलेश यांचा पक्ष वास्तवात कसा एका घराण्यापुरता आहे हे सांगताना राममनोहर लोहिया, जॉर्ज फर्नांडिस, नितीशकुमार यांची उदाहरणे दिली. मात्र यंदा अखिलेश स्वतः रिंगणात उतरल्याने सप कार्यकर्त्यांचे मनोबल वाढले. त्याची जादू या ५९ जागांवरच नव्हे तर पहिल्या टप्प्यांतील मेरठ,आग्रा, अलीगड, आझमगड मुझफ्फरनगर,मिर्झापूर पट्ट्यात दिसणार असल्याचा सपला विश्वास आहे.
Web Title: Uttarpradesh Assembly Election Bjp
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..