UP Election : पाचव्या टप्प्यातच योगींना बहुमताचा कौल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

UP assembly Election

UP Election : पाचव्या टप्प्यातच योगींना बहुमताचा कौल

लखनौ : उत्तर प्रदेशच्या मतदारांनी राज्यातील बड्या नेत्यांचे आणि राजकीय विश्‍लेषकांनी मांडलेले तर्क आणि दावे खोडून काढत शेवटच्या टप्प्यांपर्यंतच्या मतमोजणीत केवळ भाजपलाच नाही तर समाजवादी पक्षाच्या आघाडीला गॅसवर ठेवले.

वास्तविक मतदानाच्या पहिल्या दोन टप्प्यांत २०१७ च्या तुलनेत कमी मतदान पाहता राजकीय विश्‍लेषक गोंधळात दिसून आले. त्यामुळे पहिल्या दोन टप्प्यातील मतदानाचा कौल गोंधळातच राहिला. मात्र पुढील तीन टप्प्यांत मतदारांनी योगींच्याच झोळीत मतदानाचे दान टाकले आणि सहाव्या टप्प्यांपर्यंत हाच वेग कायम राहिला. सातही टप्प्यांच्या मतमोजणीत रस्सीखेच ही भाजप विरुद्ध समाजवादी पक्ष यांच्याभोवतीच राहिली.

पहिल्या टप्प्यात गेल्या निवडणुकीच्या तुलनेत १.३२ टक्के कमी मतदान झाले. या टप्प्यात गेल्यावेळी भाजपने ५८ पैकी ५३ जागा जिंकल्या होत्या.त्यामुळे भाजपला हा टप्पा कठीण होता. मेरठ, बागपत, मुझफ्फरनगर येथे भाजपला किंमत मोजावी लागली. या ठिकाणी समाजवादी पक्षाच्या १० जागा वाढल्या. आग्रा, अलीगड, मथुरा हे भाजपसमवेत राहिले.

या टप्प्यात भाजपला ११ जागा गमवाव्या लागल्या आणि समाजवादी पक्षाला मात्र १३ जागा जादा मिळाल्या. दुसऱ्या टप्प्यातील भाजपची वाटचाल खडतर राहिली. मुरादाबाद येथे सहापैकी एक , संभलमध्ये चार पैकी एक आणि अमरोहा येथे देखील एकाच जागेवर समाधान मानावे लागले.

बुंदेलखंड येथे समाजवादी पक्षाला आपला पाया भक्कम करण्याचे आव्हान होते. मैनपूरी, इटावा, एटा, कनोज येथे समाजवादी पक्षाचाच बोलबाला राहिला. भाजपला गेल्यावेळच्या ४९ पैकी ५ जागा कमी मिळाल्या तर सपच्या ८ जागा वाढल्या. मैनपूरीत करहल मतदारसंघातून अखिलेश स्वत: मैदानात होते, परंतु ते जिल्ह्यातील २ जागा भाजपकडे जाण्यापासून रोखू शकले नाही.

नऊ जिल्ह्यातील ५९ जागांपैकी भाजपने ५० जागा जिंकल्या. लखीमपूर खेरी, उन्नाव प्रकरणाचा भाजपच्या मतांवर परिणाम होईल, अशी शक्यता वर्तविली जात असताना समाजवादी पक्षाकडे या टप्प्यात केवळ सहा जादा जागा गेल्या. भाजपला मात्र दोन जागांचे नुकसान सहन करावे लागले.

पाचव्या टप्प्यात भाजपला दहा जागांचे नुकसान सहन करावे लागले तर समाजवादी पक्षाच्या पाच जागा वाढल्या. प्रयागराज जिल्ह्यातील १२ पैकी ९ जागा भाजपकडे गेल्या. या टप्प्यापर्यंत भाजपने बहुमताचा आकडा पार केला होता. अयोध्येत समाजवादी पक्षाची ताकद तीन पट वाढल्याचे दिसले.

या टप्प्यात समाजवादी पक्ष

दोनवरून १५ जागांवर पोचला तर भाजप ४६ वरून ४० वर. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे केवळ आपला गड गोरखपूर वाचवण्यात यशस्वी ठरले. तेथे ९ जागा भाजपने जिंकल्या. कुशीनगर, देवरियातही असेच चित्र होते.

या टप्प्यांत समाजवादी पक्षाला १७ जागा अधिक मिळाल्या. तर भाजपला दहा जागा गमवाव्या लागल्या. आझमगडमध्ये समाजवादी पक्षाने सर्व दहा जागा जिंकून क्लिन स्विप केले. वाराणसीत शेवटच्या दिवशी समाजवादी पक्षाने रोड शो करूनही पक्षाला या ठिकाणी खाते उघडता आले नाही. वाराणसीतील आठही जागा भाजपच्या वाटेला गेल्या.

मतदानाचे टप्पे भाजप सप अन्य एकूण जागा

पहिला ४६ १२ - ५८

दुसरा २७ २८ - ५५

तिसरा ४४ १५ - ५९

चौथा ५० ९ - ५९

पाचवा ४० १८ ३ ६१

सहावा ४० १५ २ ५७

Web Title: Uttarpradesh Assembly Election Fifth Phase

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top