महावितरणचा वीज ग्राहकांना देयकातून ‘शॉक’, देयक दुरूस्तीसाठी, ग्राहकांची वीज वितरणच्या केंद्रांवर गर्दी

सकाळ वृत्तसेेवा
Thursday, 9 July 2020

लॉकडाउन काळातील तीन महिन्यांच्या एकत्र आलेल्या वीज वितरण कंपनीच्या वीज देयकाने ग्राहकांना जोरदार शॉक बसला आहे. त्यामुळे देयक दुरूस्तीसाठी, ग्राहक वीज वितरणच्या केंद्रांवर गर्दी करीत आहेत.

मंगरुळपीर (जि.वाशीम)  ः लॉकडाउन काळातील तीन महिन्यांच्या एकत्र आलेल्या वीज वितरण कंपनीच्या वीज देयकाने ग्राहकांना जोरदार शॉक बसला आहे. त्यामुळे देयक दुरूस्तीसाठी, ग्राहक वीज वितरणच्या केंद्रांवर गर्दी करीत आहेत.

जून महिन्याचे अव्वाच्या सव्वा विद्युत बिल हाती पडताच वीज ग्राहकांना मोठा धक्का बसला. कोरोनामुळे दोन महिने मोबाईलवरच सरासरी बिल पाठविले गेले. ते काहींना मिळाले तर काहींना मेसेजच आला नाही. आता अचानक मोठ्या रकमेचे बिल आल्याने नागरिकांचा गोंधळ उडाला आहे.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

जाब विचारण्यासाठी गेलेल्या ग्राहकांना वितरणकडून समाधानकारक उत्तरही मिळत नाही. कोरोना व लॉकडाउनमुळे उद्योग, व्यवसाय ठप्प आहेत. लाखो नोकऱ्या गेल्या आहेत. नागरिकांच्या जीवन-मरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. महावितरणला मात्र त्यांच्या मासिक महसूल वसुलीचे वेध लागले आहेत.

कोरोनामुळे सध्या बहुतांश नागरिक आर्थिक अडचणीत आले असून, अनेकांचा या काळात रोजगार बुडाला, काहींच्या नोकऱ्या गेल्या आदी कारणांमुळे जनता त्रस्त आहे. अशा काळात वीज वितरण कंपनीने एप्रिल ते जून या तीन महिन्यांचे एकत्र बिल ग्राहकांना देऊन विजेचा धक्काच दिला आहे. एकत्र व जादा बिलाचे महावितरणकडून समर्थन केले जात आहे. उन्हाळ्यामुळे एप्रिल, मे महिन्यात विजेचा वापर जास्त असतो. लॉकडाउनमुळे सर्व लोक घरात होते. सर्व उपकरणे सुरू होती. विजेचा वापर अधिक होता. आयोगाने नवे दर लागू केले. या काळात नियमित रिडींग घेऊन ग्राहकांना देयके मिळाली नाहीत. सरासरी देयके भरली गेली नाहीत. आता काही ग्राहकांना तीन महिन्याचे देयक एकत्र भरावे लागत आहेत. त्यातून वीज बिल जादा आल्याचा संभ्रम निर्माण झाला असल्याचे महावितरण सांगत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: akola washim MSEDCLs shock from electricity payments to customers