१२ जागा झाल्या खुल्या; विस्थापित व रॅण्डम शिक्षकांची बदली

नीलेश डोये
Wednesday, 14 October 2020

सीईओ योगेश कुंभेजकर यांनी मध्यम मार्ग काढत १२ जागा खुल्या करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता १०२ जागांसाठी ही प्रक्रिया राबविण्यात येणार असून गुरुवारी समुपदेशनाची प्रक्रिया होणार आहे.

नागपूर : विस्थापित व रॅण्डम शिक्षकांच्या बदल्यांचा प्रश्न निकाली काढण्यासाठी सीईओ योगेश कुंभेजकर यांनी मध्यम मार्ग काढत १२ जागा खुल्या करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता १०२ जागांसाठी ही प्रक्रिया राबविण्यात येणार असून गुरुवारी समुपदेशनाची प्रक्रिया होणार आहे.

जिल्हा परिषदेअंतर्गत सद्यस्थितीत १९० जागा रिक्त असताना समुपदेशन प्रक्रियेत प्रशासनाकडून ९० जागा खुल्या करून देण्यात आल्या होत्या. शिक्षक संघटनांनी यावर आक्षेप घेत सर्व १९० जागा खुल्या करण्याचा मागणी केली. सीईओ कुंभेजकर यांनी अवघड क्षेत्रातील शाळांची चिंता व्यक्त करीत संपूर्ण जागा खुल्या करण्यास नकार दिला. हा विषय पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांच्याकडे सुद्धा गेला.

अवघड क्षेत्रातील शाळांचे काय?  सीईओंन संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना खडसावले 

केदार यांनी प्रशासनाला मध्यममार्ग काढण्याच्या सूचना केल्या. त्यामुळे सीईओंनी काही तालुक्यातील जागा कमी करून शहरालगतच्या जागा खुल्या केल्या. परंतु शिक्षकांचे समाधान झाले नाही. सीईओंनी पुन्हा मध्यम मार्ग काढत आणखी १२ जागा खुल्या करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता १०२ जागांसाठी समुपदेशन होणार आहे.

या तालुक्यातील जागा खुल्या
कामठी, काटोल, सावनेर तालुक्यातील ३-३ तर पारशिवनी, मौदा व कुही तालुक्यातील १-१ जागांचा समावेश आहे.

१२ वाजेपर्यंत अर्ज करण्याची वेळ
जागा वाढविण्यात आल्याने शिक्षकांना अर्ज करण्यासाठी अतिरिक्त वेळ देण्यात आला आहे. यानुसार शिक्षकांना गुरुवारी दुपारी १२ वाजेपर्यंत अर्ज करता येणार आहे.

बदलीसाठी दबावतंत्र!
शिक्षकांच्या बदलीसाठी प्रशासनावर दबावतंत्राचा वापर होत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे प्रशासन पुरते वैतागल्याचे सांगण्यात येते.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 12 seats open, Displaced and random teachers replaced