मस्तच नागपूर जिल्ह्यातील शाळा होणार आदर्श

 नीलेश डोये
Thursday, 29 October 2020

शाळांची निवड करताना भौतिक सुविधांनी युक्त तसेच शैक्षणिक गुणवत्ता व प्रशासकीय बाबींमध्ये उत्कृष्ट असणाऱ्या शाळांचा समावेश करण्यात आला आहे.

नागपूर  : राज्यभरातील जिल्हा परिषदेच्या ३०० प्राथमिक शाळा आदर्श करण्याचा निर्णय राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने घेतला असून नागपूर जिल्ह्यातील १३ तालुक्यातील १३ शाळांचा समावेश असणार आहे.

या शाळांची निवड करताना भौतिक सुविधांनी युक्त तसेच शैक्षणिक गुणवत्ता व प्रशासकीय बाबींमध्ये उत्कृष्ट असणाऱ्या शाळांचा समावेश करण्यात आला आहे. भौतिक सुविधांमध्ये स्वतंत्र शौचालय, सुस्थितीत असलेले वर्ग, आकर्षक इमारत, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, क्रीडांगण, क्रीडा साहित्य, विज्ञान शाळा, ग्रंथालय इत्यादी बाबींचा समावेश आहे. 

महत्त्वाची बातमी - तुम्हालाही जेवण झाल्यानंतर लगेच पाणी पिण्याची सवय आहे? मग जरा थांबा आधी हे वाचा
 

शैक्षणिक गुणवत्तेमध्ये विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी उत्तम शैक्षणिक पोषक वातावरण, व्यवस्थित लिहिता वाचता येणे, वाचन , लेखन व गणितीय क्रिया या भाषा व गणित स्तरावरील मूलभूत संकल्पना, पुस्तकांची उपलब्धता या बाबींचा समावेश आहे. या शाळेत काम करण्याची इच्छा असलेल्या शिक्षकांना किमान ५ वर्षे बदली मिळणार नाही. 

शिक्षणातून विद्यार्थ्यांचा शारीरिक, बौद्धिक व मानसिक विकास होणे ही शाळेचे मुख्य वैशिष्टे असतील. अध्ययन फलनिष्पत्तीसह सध्याच्या स्पर्धात्मक युगात विविध आव्हानांना सामोरे जाण्यासाठी त्यांच्यामध्ये नेतृत्वगुण सर्वांगीण विकास करण्यासाठी विविध विषयामध्ये प्राधान्य मिळवून देणारी विविध क्षेत्रांतील कौशल्ये विकसित करणारी ही शाळा असेल.

या शाळा होणार आदर्श

नागपूर ग्रामीण- सोनेगाव-बोरी, हिंगणा- गुमगाव, कामठी- वडोदा, काटोल- दुधाळा, नरखेड- अंबाडा (सायवाडा), कळमेश्वर- तेलकामठी, सावनेर- भेंडाळा, उमरेड- शेडेश्वर, भिवापूर- महालगाव, कुही- पचखेडी, रामटेक- भोंडेवाडा, पारशिवनी- बनपुरी, मौदा- चिरवा.

गुणवत्ता वाढण्यासाठी हातभार
या निर्णयामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होईल. तसेच शाळांची पटसंख्या व शैक्षणिक गुणवत्ता वाढण्यासाठी हातभार लागेल.
- लीलाधर ठाकरे, जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती. 

संपादन  : अतुल मांगे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 13 schools in Nagpur district will be model schools