15 जूनला प्रा. कवाडे, गजभिये होणार माजी आमदार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 जून 2020

आदिवासी नेतृत्वाला पुढे आणण्यासाठी राष्ट्रवादीकडून त्यांना संधी देण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. त्याचवेळी प्रा. जोगेंद्र कवाडे यांना पुन्हा संधी मिळावी, अशी कार्यकर्त्यांची भावना आहे. परंतु, विद्यमान राज्यपाल यांनी विधान परिषदेच्या नियुक्तीचे निकष बदलण्याची प्रक्रिया सुरू केल्याची चर्चा आहे.

नागपूरः शहरातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते प्रकाश गजभिये यांचा विधान परिषद सदस्यत्वाचा कार्यकाळ काल, शनिवारी संपुष्टात आला तर पीरिपाचे आमदार प्रा. जोगेंद्र कवाडे यांचा कार्यकाळ 15 जूनला संपुष्टात येणार आहे. त्यामुळे रिक्‍त झालेल्या व होणाऱ्या या दोन्ही जागांवर शहरातून कोण परिषदेत जाणार याबाबत राजकीय क्षेत्रात उत्सुकता आहे.

शहरात जवळपास वीस आमदार आहेत. यातील विधान परिषदेवरील राष्ट्रवादीचे प्रकाश गजभिये निवृत्त झाले तर आठवडाभराच्या अंतराने पीरिपाचे प्रा. जोगेंद्र कवाडे निवृत्त होणार आहेत. त्यामुळे त्यांचा वारसदार शहरातील असेल की बाहेरील? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा आहे. प्रकाश गजभिये यांच्या जागेवर शहरातून एका आदिवासी नेत्याच्या नावाची चर्चा आहे.

वाचा- सावधान! तुम्ही मास्क वापरत नसाल तर होतील गुन्हे दाखल

आदिवासी नेतृत्वाला पुढे आणण्यासाठी राष्ट्रवादीकडून त्यांना संधी देण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. त्याचवेळी प्रा. जोगेंद्र कवाडे यांना पुन्हा संधी मिळावी, अशी कार्यकर्त्यांची भावना आहे. परंतु, विद्यमान राज्यपाल यांनी विधान परिषदेच्या नियुक्तीचे निकष बदलण्याची प्रक्रिया सुरू केल्याची चर्चा आहे. यामुळे ही निवड अधिक काटेकोरपणातून होईल. यापूर्वी मुख्यमंत्री यांनी ठरवलेल्या नावावर शिक्कामोर्तब केले जात आहे. परंतु, अलीकडे निकषाचे पालन व्हावे हा हेतू राज्यपालांनी स्पष्ट केला. रिपाइंला कॉंग्रेस नेहमीच धर्मनिरपेक्ष वाटत असल्याने डोळे बंद करून रिपब्लिकन नेते कॉंग्रेससोबत येत होते. यामुळे कॉंग्रेसकडून नेहमीच गृहीत धरले जात होते. परंतु सध्याचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पक्षाने सहा वर्षांपूर्वी भाजपशी राज्यात मैत्री केल्यानंतर चित्र बदलले. रिपब्लिकन कार्यकर्ते कॉंग्रेस आणि भाजपात उजळ माथ्याने वावरू लागले आहेत.

रिपब्लिकन अस्तित्वावर प्रश्‍नचिन्ह
पाच दशकापूर्वी रिपब्लिकन शक्ती नजर लागेल अशीच होती. त्याकाळात जनसंघ, कॉंग्रेस आणि नागविदर्भ चळवळीसमोर डॉ. बाबासाहेबांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पक्ष म्हणजे "गजराज'सारखा उभा होता. सत्ता नव्हती, परंतु जनहित जोपासणाऱ्या रिपब्लिकन पक्षाचा प्रभाव होता. परंतु, रिपब्लिकनांना युतीची सवय लागली आणि स्वबळावर निवडणूक जिंकण्याच्या विचारांपासून दुरावले. सत्ताधाऱ्यांच्या मदतीने विधान परिषदेचे सदस्य मिळवण्यात धन्यता मानू लागले. सध्या प्रा. जोगेंद्र कवाडे पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे म्हणून विधान परिषदेचे सदस्य आहेत. त्यांची मुदत संपणार असल्यामुळे विधान परिषदेतील रिपब्लिकन अस्तित्व संपणार आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: On 15 June Kawade,Gajbhiye will be ex MLA