उपराजधानीला मिळतेय ही नवी ओळख, वाचा हे जळजळीत वास्तव...

अनिल कांबळे
मंगळवार, 9 जून 2020

लॉकडाऊनला शिथिलता मिळताच गुन्हेगारांनी तोंड बाहेर काढले असून त्यावर पोलिसांना नियंत्रण मिळविण्यासाठी खूप आटापिटा करावा लागत आहे. गेल्या तीन महिन्यांपासून गुन्हेगारांच्या टोळ्यांनी संयम ठेवला होता.

 

नागपूर : गृहमंत्र्यांचे शहर म्हणून ओळख असलेल्या राज्याच्या उपराधानीला आता नागपूर नव्हे तर गुन्हेपूर नवी ओळख निर्माण झाली आहे. उपराजधानीत पोलिसांचा वचक संपल्यामुळे हत्याकांडाची मालिका आणि गॅंगवार सुरू असल्याचे चित्र आहे. गेल्या तीन महिन्यांत तब्बल 23 जणांची हत्या झाली तर 20 जणांचा खून करण्याचा प्रयत्न झाला. गुन्हेगारांमुळे शहरातील कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे बिघडली असून नागपूरला "क्राईम सीटी' म्हणून पुन्हा ओळखल्या जाण्याची शक्‍यता आहे.

 

अरे ओ सांबा...प्रेक्षकांच्या मन:पटलावर राज्य करणारा खलनायक

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनामुळे लॉकडाऊन आणि संचारबंदी असल्याने गेल्या अडीच महिन्यांत शहरातील अनेक गुन्हेगार अंडरग्राउंड होते. त्यामुळे या काळात गुन्ह्याचे प्रमाणही कमी होते. मात्र, लॉकडाऊनला शिथिलता मिळताच गुन्हेगारांनी तोंड बाहेर काढले असून त्यावर पोलिसांना नियंत्रण मिळविण्यासाठी खूप आटापिटा करावा लागत आहे. गेल्या तीन महिन्यांपासून गुन्हेगारांच्या टोळ्यांनी संयम ठेवला होता. आता संचारबंदीला थांबा मिळताच गुन्हेगारी टोळ्या पुन्हा सक्रिय झाल्या आहेत.

त्यामुळे प्रतिस्पर्धी टोळीचे वर्चस्व संपविण्यासाठी एकेकाचा "गेम' करण्याची तयारी टोळ्या करीत आहेत. पारडीतील कुख्यात गुंड बाल्या वंजारी आणि यशोधरानगरातील गॅंगस्टर अन्नू ठाकूर यांचा गॅंगवॉरमधून "गेम' करण्यात आला. बाल्या आणि अन्नू हे दोघेही खतरनाक गुंड होते, त्यांच्या टोळ्यांचीही शहरात दहशत होती. डॉन संतोष आंबेकर आणि राजू बद्रे कुख्यात गॅंगस्टर कारागृहात असल्याने आता चेल्याचपाट्यांच्या अनेक टोळ्या निर्माण झाल्या आहेत. त्या टोळ्या वर्चस्व संपविण्यासाठी एकमेकांच्या जीवावर उठल्या आहेत. पोलिसांचे नेटवर्क अयशस्वी होत असल्याने शहरात हत्याकांडांची मालिका सुरू आहे.
 

सात दिवसांत सात खून

गेल्या सात दिवसांत सात हत्याकांड उघडकीस आले आहेत. यात बाल्या वंजारी (पारडी), अन्नू ठाकूर (यशोधरानगर), कार्तिक सारवे (प्रतापनगर), वैभव मूर्ते (हुडकेश्‍वर), राज डोरले (महाल), नवीन कामठी आणि गणेशपेठमधील हत्याकांडाची अद्याप ओळख पटली नाही. तर मे महिन्यातही पाच हत्याकांड घडले आहेत. हत्याकांड सत्रांवर पोलिसांची वचक संपल्याची स्थिती निर्माण झाली आहे.
 

गुन्हे शाखा झाली "म्हातारी'

नागपूर गुन्हे शाखेचा पूर्वी मुंबई पोलिसांप्रमाणेच राज्यात दरारा होता. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून गुन्हे शाखेची कामगिरी खालावली आहे. गुन्हे शाखेत तेच ते कर्मचारी "सेटिंग' लावून प्रवेश करतात. त्यामुळे नव्या दमाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना संधी मिळत नाही. त्यामुळे जुने कर्मचारी तपास आणि प्रकटीकरणाच्या उद्देशापासून भटकत असून भलत्याच कामाकडे त्यांचे लक्ष आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 23 murders and 32 rapes of women in three months in Nagpur city