नागपुरात कोरोनाबाधितांची संख्या हजाराच्या उंबरठ्यावर ; आणखी 25 जणांना बाधा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 जून 2020

नागपुरात दोन आठवड्यात साडेचारशेवर कोरोनाबाधित वाढले. सतत कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने सामाजिक संसर्गाची भीती व्यक्त केली जात आहे. गेल्या काही दिवसांत नागरिकांची रस्त्यांवर वाढलेल्या गर्दीने चिंतेत आणखी भर पडली आहे.

नागपूर : शहरात कोरोनाबाधितांचा आलेख वाढत असून, आज 25 जणांना कोरोनाचे निदान झाले. त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या 997 पर्यंत पोहोचली. शहरातील कोरोनाबाधितांची संख्या आता हजाराच्या उंबरठ्यावर पोहोचली. एम्स, मेयो व इतर खाजगी लॅबमधील अहवालातून 25 कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले.

शहरातील वेगवेगळ्या विलगीकरणातून घेतलेल्या नमुन्यातून 25 जणांना बाधा झाल्याचे निष्पन्न झाले. यात नाईक तलाव बांगलादेश परिसरातील 13 जणांचा समावेश आहे. वाढत्या संख्यामुळे नाईक तलाव बांगलादेश परिसर आता राज्याच्या नकाशावर आला. या परिसरात झालेल्या पार्टीने कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याचा दावा महापालिका प्रशासनानेही केला. मात्र, पोलिसांनी ही पार्टी झाली नसल्याचे स्पष्टीकरण दिले. याशिवाय जुनी मंगळवारी, डोबीनगर, सतरंजीपुरा, श्रमिकनगर, एसआरपीएफ क्षेत्रातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.

वाचा- नागपुरात गॅंगवॉर पेटले; तिघांनी युवकाचे अपहरण करून केले असे...

दोघे एमआयडीसी परिसरातील आहेत. 31 मे रोजी शहरातील बाधितांची संख्या 540 होती. आज 14 दिवसांत ही संख्या 995 पर्यंत पोहोचली. अर्थात दोन आठवड्यात साडेचारशेवर कोरोनाबाधित वाढले. सतत कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने सामाजिक संसर्गाची भीती व्यक्त केली जात आहे. गेल्या काही दिवसांत नागरिकांची रस्त्यांवर वाढलेल्या गर्दीने चिंतेत आणखी भर पडली आहे. काल एका भिक्षेकरीसह 30 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे रुग्णसंख्या 972 वर पोहोचली होती.

बांगलादेशमधील वाढता आलेख
दररोज वेगवेगळ्या क्षेत्रातून एक-दोन कोरोनाबाधित आढळून येत आहे. मात्र, नाईक तलाव बांगलादेश परिसराचा आलेख वेगाने वाढत आहे. महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत 229 जण कोरोनाबाधित आढळून आले. यातील 30 जण कोरोनामुक्त झाले असून सध्या 199 जणांवर उपचार सुरू आहे. सर्वाधिक 249 रुग्ण मोमीनपुरा क्षेत्रातून आढळले. त्यानंतर आता नाईक तलाव बांगलादेश सर्वाधिक रुग्णाचा दुसरा परिसर ठरला.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 25 More tested Corona Positive; Paitent tally about to touch thousand