धापेवाडा यात्रेची 280 वर्षांची परंपरा मोडीत निघणार; या कारणामुळे घडणार असे... 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 27 जून 2020

येथील स्वयंभू विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिरात दरवर्षी एकादशी व आषाढी पौर्णिमा प्रतिपदेला मोठी यात्रा भरते. 280 वर्षांपासून या यात्रेचे अखंडपणे आयोजन करण्यात येते. परंतु, या वर्षी कोरोनाच्या संकटामुळे या यात्रेला स्थगिती देण्यात आली आहे.

कळमेश्‍वर (नागपूर)  : विदर्भाचे पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धापेवाडा येथील स्वयंभू विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिरात दरवर्षी एकादशी व आषाढी पौर्णिमा प्रतिपदेला मोठी यात्रा भरते. 280 वर्षांपासून या यात्रेचे अखंडपणे आयोजन करण्यात येते. परंतु, या वर्षी कोरोनाच्या संकटामुळे या यात्रेला स्थगिती देण्यात आली आहे. 1 जुलै एकादशी व 6 जुलैला आषाढी पौर्णिमेच्या यात्रेला यात्रेकरूंनी येऊ नये, असे आवाहन मंदिर ट्रस्टच्या वतीने केले आहे. 

दरवर्षी एकादशी व आषाढी पौर्णिमेला लाखोंच्या संख्येने भाविक विठुरायाचे दर्शन घेतात. लॉकडाउनपासून विठ्ठल-रुक्‍मिणीचे मंदिर बंद ठेवण्यात आले आहे. सध्या अनलॉक असले, तरी राज्य सरकारकडून मंदिर उघडण्याचे आदेश मिळालेले नाहीत. त्यामुळे भाविकांना विठुरायाचे दर्शन घेता येणार नाही. पहिल्यांदाच या यात्रेत खंड पडत असल्याने भाविकांची निराशा होणार आहे. धापेवाडा येथे विठ्ठलाचे भक्त श्रीसंत कोलाबाजी महाराज होऊन गेले. महाराजांनी त्या काळी अनेक वर्षे पंढरपूरची वारी केली.

त्यानंतर वृद्धापकाळाने महाराज पंढरपूरला जाऊ शकले नाही. ते विठुरायाचे लाडके भक्त होते. त्यामुळे स्वत: त्यांच्या स्वप्नात येऊन धापेवाडास्थित चंद्रभागेच्या काठावरच्या विहिरीत स्वयंभू विठ्ठलमूर्तीच्या रूपात प्रगट झाले. तेव्हापासून तिथे विठ्ठलमूर्तीची स्थापना करण्यात आली. आजही गेल्या 280 वर्षांपासून आषाढी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी साक्षात विठ्ठल धापेवाड्यात दाखल होत असतात, अशी आख्यायिका आहे. तेव्हापासून दरवर्षी आषाढी पौर्णिमेला भक्तांना दर्शन देतात. मात्र, या वर्षी हा योग येणार नाही. 

हेही वाचा : पारशिवनीच्या भाजीबाजारात विक्रेत्यांनी केला राडा; काय आहे कारण...

पार पडली आढावा बैठक 
यात्रेच्या पार्श्‍वभूमीवर 25 जूनला कळमेश्‍वर तहसील कार्यालयात आढावा बैठकीचे आयोजन केले होते. बैठकीला सावनेरचे उपविभागीय अधिकारी अतुल मेहत्रे, पोलिस उपविभागीय अधिकारी अशोक संबळकर, नायब तहसीलदार सुजाता गावंडे, सावनेरचे पोलिस निरीक्षक अशोक गायकवाड, धापेवाड्याचे सरपंच सुरेश डोंगरे, विठ्ठल-रुक्‍मिणी देवस्थानचे सचिव आदित्य पवार आदी उपस्थित होते. या वेळी उपविभागीय अधिकारी अतुल मेहत्रे यांनी या वर्षी यात्रा भरणार नाही. कोरोना काळात लॉकडाउन स्थितीत मंदिर जसे बंद ठेवण्यात आले होते, तसेच राहील. बाहेरून येणाऱ्या व्यक्तीवर कडक कारवाई करण्यात येईल. सरपंच डोंगरे यांना गावात कुठल्याही घरी यात्रेनिमित्त कुठलाही पाहुणा येणार नाही याची दक्षता घ्यावी. 

या वर्षी आपण आपल्या घरूनच विठ्ठलाला प्रणाम करावा. यात्रेला येऊ नये. यात्रेच्या पार्श्‍वभूमीवर 30 जूनपासून धापेवाडा येथे कलम 144 लागू करण्यात येत आहे. मंदिर परिसरातील मंदिराकडे येणारे सर्व मार्ग बंद करण्यात येणार आहेत. सुमारे 250 पोलिस कर्मचारी, अधिकारी बंदोबस्ताकरिता तैनात करण्यात येणार आहेत. तसेच कळमेश्‍वर, ब्राह्मणी, सावनेर, काटोल मार्गावरून धापेवाड्याकडे जाणाऱ्या मार्गावर पोलिस बंदोबस्त असणार आहे. 
-आदित्य पवार, सदस्य व सचिव, विठ्ठल-रुक्‍मिणी ट्रस्ट 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 280 years old tradition will be broken