कोरोनाब्लास्ट : उपराजधानीत एकाच दिवशी 47 बाधित

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 मे 2020

सतरंजीपुरा, मोमीनपुरानंतर आज 19 रुग्ण आढळून आलेला नाईक तलाव बांगलादेश परिसर नवा हॉटस्पॉट ठरण्याचे संकेत मिळत आहे. शहरात 11 मार्च रोजी पश्‍चिम नागपुरातील पहिला कोरोनाबाधित आढळला.

नागपूर : शहरात आज एकाच दिवशी कोरोनाबाधितांच्या संख्येत 47 जणांची भर पडल्याने प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. शहरातील मेयो, एम्स, न्यूरॉन येथून आलेल्या तपासणी अहवालातून आलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येमुळे बाधितांचा आलेख 505 वर पोहोचला. आज झालेल्या निदानात एकाच कुटुंबातील 16 जणांचा समावेश असल्याची धक्कादायक बाबही पुढे आली. यापूर्वी एकाच दिवशी पॉझिटिव्ह आलेल्यांची सर्वाधिक संख्या 44 होती.

गेल्या काही दिवसांत शहरात वेगाने कोरोनाग्रस्तांमध्ये वाढ होत आहे. नवनव्या भागांमध्ये कोरोनाग्रस्तांची वाढ होत आहे. सतरंजीपुरा, मोमीनपुरानंतर आज 19 रुग्ण आढळून आलेला नाईक तलाव बांगलादेश परिसर नवा हॉटस्पॉट ठरण्याचे संकेत मिळत आहे. शहरात 11 मार्च रोजी पश्‍चिम नागपुरातील पहिला कोरोनाबाधित आढळला.

यानंतर पश्‍चिम, दक्षिण पश्‍चिम, मध्य, पूर्व आणि उत्तर नागपुरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत गेली. जवाहरनगर, ताजनगरमुळे दक्षिण नागपूरही कोरोनाग्रस्ताच्या यादीत आले. कोरोनाग्रस्तांचा आलेख काल, गुरुवारी साडेचारशेवर गेला. आज 47 रुग्णांची भर पडल्याने 505 वर आलेख पोहोचला.

शहरातील पाचपावली, वनामती, रविभवन, आरपीटीएस या विलगीकरण केंद्रातील संशयितांचा तपासणी अहवाल सायंकाळपर्यंत आला अन्‌ एका दिवसातील सर्वाधिक रुग्णसंख्येचा 44 हा आकडा मागे पडला. सायंकाळपर्यंत 41 जणांचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला. यात मेयोमधील 33, एम्समध्ये 8 नमुने तपासण्यात आले. त्यानंतर काही वेळातच 6 जणांचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला.

विशेष म्हणजे यात एकाच कुटुंबातील 16 जणांचा समावेश असल्याने खळबळ माजली आहे. नाईक तलाव बांगलादेश येथील 19, मोमीनपुरा, आझमशहा चौकातील प्रत्येकी दोन तर सतरंजीपुरा येथील एक रुग्ण आहे. मोमीनपुरा, सतरंजीपुऱ्यात सर्वाधिक रुग्ण असून येथील नागरिकांना विलगीकरण केंद्रात ठेवण्यात आले आहे. या दोन्ही भागात कोरोनाबाधितांची संख्या सतत वाढत आहे.

Video :खासदार पत्नी आमदार पतीचे केस कापतात तेव्हा...

8 जण परतले घरी

शहरात कोरोनाग्रस्तांवरही उपचार सुरू असून आज 8 जण कोरोनामुक्त झाले. कोरोनासोबत यशस्वी लढा देऊन घरी परतणाऱ्यांची संख्या 375 वर पोहोचली आहे. राज्यात आज एकाच दिवशी 8381 रुग्णांना घरी सोडण्यात आले. राज्यात आतापर्यंत 26 हजार 997 लोकांनी कोरोनावर मात केली.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 47 disrupted Corona a single day in the Nagpur city