आधी होती रोज 20 हजार किलोंची मागणी, आता डबघाईस आला हा व्यवसाय 

राजेश रामपूरकर
मंगळवार, 23 जून 2020

कोरोनाच्या संसर्गापूर्वी गृहिणींसह हॉटेल्स व्यावसायिकांकडून निवडलेल्या लसणाच्या पाकळ्या आणि पेस्टला महिन्याला 20 हजार किलोची मागणी होती. त्यामुळे महिन्याला 24 लाखांची उलाढाल या व्यवसायात होत असे.

नागपूर : झणझणीत सावजीसह चायनिज, कॅटरर्स आणि लहान-मोठ्या हॉटेल्समधील खाद्यान्नाचा स्वाद वाढवण्यासाठी लसूण आवश्‍यक. काळानुरूप हॉटेल्स, खानावळ, कॅटरर्स चालक निवडलेल्या पाकळ्या आणि तयार पेस्टकडे वळल्याने या नव्या व्यवसायाला झळाळी मिळाली. मात्र, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे या उद्योगाला आता "ब्रेक' लागला. मागील तीन महिन्यांत 75 लाखांचा व्यवसाय बुडाला असून, पाच हजारांपेक्षा जास्त लोकांचा रोजगार गेला आहे. 

कोरोनाच्या संसर्गापूर्वी गृहिणींसह हॉटेल्स व्यावसायिकांकडून निवडलेल्या लसणाच्या पाकळ्या आणि पेस्टला महिन्याला 20 हजार किलोची मागणी होती. त्यामुळे महिन्याला 24 लाखांची उलाढाल या व्यवसायात होत असे. कोरोनामुळे गेल्या तीन महिन्यांपासून हॉटेल्ससह खानावळ, लग्न सोहळे आणि पार्ट्या बंद असल्याने या व्यवसायावर अवकळा आली आहे.

हृदयद्रावक घटना! आठ महिन्यांची गर्भवती गेली रुग्णालयातून पळून; भूमकाजवळ गेली असता झाला अंत
 

आता फक्त 150 ते 200 किलो लसण पेस्ट आणि निवडलेल्या पाकळ्यांची मागणी होत आहे. हॉटेल्समधून खाद्य पदार्थांचे "पार्सल' दिले जात असले तरी ते प्रमाण अत्यल्प आहे. पुढील सहा ते आठ महिने या व्यवसायावर मंदीचा छाया राहणार असल्याचे एका सर्वेक्षणातून पुढे आले आहे. 

शहरातील टेलिफोन एक्‍सचेंज चौक, इतवारी, सदर, महाल, नंदनवन, बर्डी, मेडिकल चौक, अमरावती रोड, वर्धा रोड, उमरेड रोड, कोराडी, कामठी रोड, धरमपेठ, सक्करदरा, मोमिनपुरा, रामदासपेठ, मनीषनगर, सेंट्रल एव्हेन्यू, बस स्टॉप, रेल्वे स्थानक आदी परिसरातील तीन हजारांपेक्षा अधिक हॉटेल्स, चायनिज, खानावळी, सावजी 100 टक्के बंद असल्याचे दिसून आले. खानावळीही बंद आहेत.

तीन महिन्यांपासून लसण पाकळ्या आणि पेस्टचा व्यवसाय बंद असल्याने या व्यवसाय डबघाईस आलेला असताना अनेकांचा रोजगार गेला आहे. मोठी गुंतवणूक करून अनेकांनी या व्यवसायाचा श्रीगणेशा केला असताना स्पीड घेण्यापूर्वीच ब्रेक लागला आहे. शहरात पाच ते सहा लहान मोठ्या लसणाच्या पाकळ्या व पेस्ट तयार करणारे उद्योजक आहेत. तर 100 पेक्षा अधिक महिला गट आणि लहान मोठे व्यावसायिक या क्षेत्रात आहेत. 

 
कामगार बेरोजगार 
शहरात तीन हजारांपेक्षा लहान मोठे हॉटेल्स, खानावळी आणि सावजी भोजनालय आहेत. त्यात महिन्याला मोठ्या प्रमाणात निवडलेला लसूण आणि पेस्टची मागणी होती. ती आता 10 ते 12 टक्‍क्‍यांवर आली आहे. यामुळे या व्यवसायातील संचालक आणि कामगार बेरोजगार झाले आहे. काहींनी व्यवसाय विक्रीसाठी काढलेले आहेत. 
अमिताभ मेश्राम, संचालक प्रोवेस ग्रुप.

 
 
केवळ 25 टक्‍के मालाची विक्री 
कोरोनापूर्वी निवडलेल्या पाकळ्यांच्या व्यवसायाला चांगले दिवस आले होते. आता अनेक लहान मोठे व्यवसाय आणि मॉल्स बंद असल्याने व्यवसाय प्रभावित झाला होता. काही दुकाने सुरू झालेली असली तरी मॉल्स सुरू झालेले नसल्याने फक्त 25 टक्केच मालाची विक्री होत आहे. 
-प्रियंका देढे, संचालक हेल्दी फूड


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 75 lakh business selling garlic sank; Five thousand workers hit