‘या’ जिल्ह्यातील ८३ टक्के रुग्ण झालेत बरे; दिलासादायक बाब....

file
file

नागपूर ग्रामीणः  दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढतीवर असून याला कारणीभूत नागरिकांची मुक्त वागणूक असल्याचे समोर येत आहे. सोशल डिस्टनिंग न पाळणे, हाताला सॅनिटायझर न लावणे, गर्दी करणे आदी सुरक्षिततेचे भान न ठेवल्यामुळे संसर्गाचा प्रसार होत आहे. पॉझिटिव्ह होण्याचे प्रमाण वाढत असले तरी  जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांचे बरे होण्याचे प्रमाण हे ८३ टक्क्यांवर आले आहे. नागपूरकरांसाठी ही नक्कीच दिलासादायक बाब आहे.

आज १६६२ रुग्ण  बरे होऊन घरी गेले. १२७३ नवीन रुग्णांची भर पडली असून एकूण पॉझिटिव्ह रुग्णसंख्या ६६३८० इतकी झाली आहे. आतापर्यंत बरे होऊन घरी  गेलेल्या रुग्णांची संख्या ५५२१२ झाली आहे. एकूण क्रियाशील रुग्ण ९०१८ असून पैकी ३७९८ गृह विलगीकरणात आहेत. आज ५४ मृत्यू झाले. त्यापैकी ८ मृत्यू जिल्ह्याबाहेरचे आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८३.१८ टक्के इतके आहे.

प्राथमिक आरोग्य केंद्रांना ऑक्सिजन बेड द्या !
सावनेरः ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रात पुरेसे ऑक्सिजन बेड उपलब्ध नसल्याने  कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आरोग्य केंद्रांना ऑक्सीजन बेड उपलब्ध करण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतींना जिल्हा परिषदने खरेदीचा आदेश द्यावा व खरेदी केलेला बेड स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सुपूर्द करावे, या मागणीसाठी जि.प.सदस्य प्रकाश खापरे यांच्या नेतृत्वात जि.प. अध्यक्ष रश्मी बर्वे व उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी अवंतिका लेकुरवाळे, सुचिता ठाकरे, प्रकाश खापरे, विष्णू कोकड्डे, दुधाराम सव्वालाखे आदींची उपस्थिती होती. उपाध्यक्ष मनोहर कुंभारे व सावनेर पंचायत समितीचे खंडविकास अधिकारी अनिल नागणे यांनाही मागणी निवेदन देण्यात आले. निवेदनकर्त्यां मध्ये आदींचा समावेश होता. ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे, यामुळे जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेचा ताणही वाढत आहे. रुग्णांना वेळीच बेड उपलब्ध होत नसल्याने रुग्णांवर प्राण गमावण्याची वेळ आल्याच्या घटना घडताना दिसून येत आहे. यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीने १५ व्या वित्त आयोगातून एक ऑक्सीजन बेड खरेदी करून स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सुपूर्द करण्याचे आदेश जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना द्यावे, असे झाल्यास रुग्णांना तात्पुरत्या उपचारासाठी सोयीचे होऊन काही प्रमाणात समस्या दूर होईल, असे निवेदनकर्त्यांचे म्हणणे आहे.

तपासणी करण्यासाठी येणाऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन
जलालखेडाः प्रशासन आणि जनता यांच्या समन्वयातून जिल्ह्यात कोरोनावर नियंत्रण मिळविता येऊ शकणार आहे. शासनाने ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ हे अभियान याच उद्देशाने राबविण्यात येत आहे. त्यामुळे जनतेने या अभियानाला सहकार्य करावे, असे आवाहन नरखेड तालुका आरोग्य अधिकारी तसेच तालुक्यातील सर्वच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केले आहे. १५ सप्टेंबर ते २५ ऑक्टोबर या कालावधीत नरखेड तालुक्यात ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ हे अभियान राबविण्यात येत आहे. अभियानातून व्यापक सर्वेक्षण होणार आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी शासनाने आखून दिलेल्या त्रिसूत्रीची काळजीपूर्वक अंमलबजावणी करणे, जास्तीत जास्त सर्वेक्षणातून वेळीच रुग्ण शोधून त्यांच्यावर उपचार करणे, जेणेकरून मृत्युदर टाळता येऊ शकतो. त्याचबरोबर कोरोनामुक्त झालेल्यांना घ्यावयाची काळजी याचीही जनजागृती याच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.  सर्व्हेकरिता पथक करण्यात आले असून यात आशा वर्कर, अंगणवाडी सेविका यांच्याबरोबर दोन स्वयंसेवक राहणार आहेत. प्रत्येक टीमला ५० घरांची जबाबदारी देण्यात येणार आहे. दीड महिना हे सर्वेक्षण चालणार असून, कोरोनासदृश लक्षणे दिसल्यास त्यांची टेस्ट करून घ्यायच्या आहेत. सर्व्ह करण्याकरिता येणारे पथक सर्वांचे तापमान व ऑक्सिजन तपासणार असून यामुळे संभाव्य धोका टाळता येणार आहे. याकरिता सर्वांनी पथकाला सहकार्य करण्याचे आवाहन नरखेड तालुका अधिकारी डॉ. विद्यानंद गायकवाड व तालुक्यातील सर्वच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com