
नागपूर : झणझणीत सावजी व मसालेदार पदार्थ खाण्यासाठी कायम सज्ज असलेल्या नागपूरकरांना रेस्टॉरंटमध्ये जाऊन आवडीच्या खाद्यपदार्थांवर ताव मारण्यासाठी वाट पाहावी लागणार आहे. अनलॉकच्या काळात शहरातील काही हॉटेल्सने पार्सल सेवा सुरू केली असली तरी त्याला हवा तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. या व्यवसायाला सुगीचे दिवस येण्यास अजून पाच ते सहा महिने लागणार असल्याची शक्यता वर्तवली जाते. या काळात शहरातील लहान जागेवर असलेल्या सावजीसह इतरही लहान-मोठ्या 20 टक्के हॉटेल्सचे शटर डाऊन होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
अनलॉकच्या पहिल्या टप्प्यात लॉकडाउनमध्ये असलेले अनेक नियम शिथिल केले आहेत. केंद्र सरकारने अनेक ठिकाणी हॉटेल्स सुरू करण्याची परवानगी दिलेली आहे. राज्य सरकारने नवीन मार्गदर्शक सूचना काढल्या असून, कोरोनाचे रुग्ण अधिक असलेल्या शहराबाबत स्थानिक प्रशासनच निर्णय घेत आहे. त्यानुसार नागपूर महानगरपालिकेने काढलेल्या परिपत्रकात खाद्यपदार्थाची 30 जूनपर्यंत पार्सल पद्धती सुरू ठेवण्याची परवानगी दिलेली आहे.
दरम्यान, रेस्टॉरंट आणि हॉटेल सध्यातरी सुरू होणार नसल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. हॉटेल्स व रेस्टॉरंट सुरू झाल्यानंतरही खवय्ये हॉटेलमध्ये येतील की नाही याबाबतही शंका आहे. कोरोना विषाणूमुळे नागरिक आरोग्याबद्दल अधिकच जागरूक झाल्याने ग्राहकांची वर्दळच मंदावणार आहे. हॉटेल सुरू करण्याची परवानगी प्रशासनाने दिल्यानंतर ग्राहक आणि कर्मचारी या सर्वांच्या सुरक्षेच्या दृष्टीने योग्य ती खबरदारी घेण्याकडे अधिक लक्ष द्यावे लागणार आहे.
या नियमांचे पालन करणे लहानशा जागेत बेरोजगारांनी थाटलेल्या सावजी हॉटेलसह इतरही लहान हॉटेलला शक्य नसल्याने पहिली गदा यांच्यावरच येणार आहे. या हॉटेलमध्ये दोन टेबलमध्ये सामाजिक अंतर ठेवणे, 50 टक्के कर्मचारी कामावर असणे, ज्या ठिकाणी कर्मचारी आणि ग्राहक यांच्या स्पर्धा होणार आहे. त्या सर्व जागा सतत सॅनिटाईज करणे, तसेच काम करीत असताना कोणती खबरदारी घेतली पाहिजे याबाबतही कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण द्यावे लागणार आहे, याचे पालन लहान हॉटेल कसे पाळतील, असाही प्रश्न ऐरणीवर आला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने 30 जूननंतर हॉटेल सुरू होतील याबाबत स्पष्ट केले आहे. शहरात एक हजारापेक्षा अधिक लहान मोठे हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि बार आहेत. त्यातील 10 ते 15 टक्केच व्यावसायिक पार्सलची सेवा देत आहेत. बार बंदच आहेत. या स्थितीत शहरातील 20 टक्के लहान मोठे हॉटेल्स बंद होतील अशी शक्यता आहे. या व्यवसायात सरासरी 10 ते 12 हजार कामगार कार्यरत असून, ते सर्वच बेरोजगार झालेले आहेत.
गणेश दवे, अध्यक्ष, नागपूर ओनर्स हॉटेल असोसिएशन
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.