कुख्यात रोशन शेख गॅंगवर मोक्‍का 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 जून 2020

गौवला बळजबरी सोबत नेले. चाकू दाखवून जिवे मारण्याची धमकी देत 20 लाख रुपयांची खंडणी मागितली होती. त्याच्या खिशातून 11 हजार रुपयेसुद्धा हिसकावून घेतले. दुकानही आम्हालाच विकण्यासाठी दमदाटी केली. त्यानंतर आरोपींनी गौरवला सोडून दिले.

नागपूर : प्रॉपर्टीच्या मालकी हक्‍कावरून सुरू असलेल्या वादातून कुख्यात रोशन शेख आणि त्याच्या साथीदारांनी एका व्यावसायिकाचे अपहरण करीत मारहाण केली होती. व्यावसायिकाला 20 लाख रुपयांची खंडणीसुद्धा मागितली होती. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. आता पोलिस आयुक्‍तांनी गांभीर्याने दखल घेऊन रोशन शेखच्या गॅंगवर मोक्‍का लावला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोशन शेख हा कुख्यात गुंड असून त्याच्यावर आतापर्यंत अनेक गंभीर प्रकरणे दाखल आहेत. रोशनच्या टोळीतील पाच जणांना पोलिसांनी अटक केली असून त्यामध्ये अंकित पाली, सोहेल खान, सलीम काजी आणि इरफान खान यांचा समावेश आहे. गौरव याचे धरमपेठमधील भगवाघर ले-आटमध्ये दुकान आहे. या दुकानाच्या विक्रीवरून गौरवचा काही लोकांशी वाद सुरू होता. त्यामुळे काही गुंड प्रवृत्तीचे लोक त्याचे दुकान हडपण्याच्या प्रयत्नात होते. रोशन आणि अंकित हे दोघेही दुकान विकत घेण्यास इच्छुक होते.

2 मे 2019 ला दुपारी गौरव सदरमधील मोतीमहल रेस्टॉरेंटमध्ये गेला होता. दरम्यान, तेथे आरोपी पोहचले. त्यावेळी गौवला बळजबरी सोबत नेले. चाकू दाखवून जिवे मारण्याची धमकी देत 20 लाख रुपयांची खंडणी मागितली होती. त्याच्या खिशातून 11 हजार रुपयेसुद्धा हिसकावून घेतले. दुकानही आम्हालाच विकण्यासाठी दमदाटी केली. त्यानंतर आरोपींनी गौरवला सोडून दिले. गौरवने पोलिस ठाण्यात पोहोचून तक्रार दिली. या प्रकरणी सदर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. 

हेही वाचा : बनावट विक्रीपत्र तयार करून हडपले घर 

आणखी दोन गुन्हे दाखल 
आरोपी रोशनवर आणखी एका व्यावसायिकाला खंडणी मागण्याचा गुन्हा सीताबर्डी पोलिस ठाण्यात दाखल झाला. त्यानंतर मारहाण केल्याप्रकरणी अंबाझरी ठाण्यात गुन्हा दाखल झाला. रोशनच्या गॅंगची वाढती दहशत पाहता पोलिस आयुक्‍त डॉ. बी. के. उपाध्याय यांनी गॅंगवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले. रोशनवर यापूर्वीसुद्धा खुनाचा प्रयत्न, पिस्तूल वापरणे, खंडणी मागणे यासह अन्य गंभीर गुन्हे दाखल आहेत. डीआयजी डॉ. नीलेश भरणे, गुन्हे शाखेचे उपायुक्‍त गजानन राजमाने यांच्या मार्गदर्शनात रोशनच्या गॅंगवर मोक्‍का कारवाई करण्यात आली. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Action on hooligans