तुकाराम मुंढेंच्या ट्विटरवर आदित्य ठाकरेंची कमेंट, नागनदीबाबत म्हणाले...

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 जून 2020

शहरातील नाग नदीची स्वच्छता दरवर्षी केली जाते. मात्र, यंदा नाग नदीचे पात्र रुंदच नव्हे तर खोलही करण्यात आले. त्यामुळे पावसाळ्यात पावसाचे पाणी काठांवरील नागरिकांच्या घरापर्यंत जाण्याऐवजी थेट शहराबाहेर वाहून जाणार आहे. त्यामुळे किनाऱ्यावरील नागरिकांना यंदा दिलासा मिळणार आहे. लॉकडाऊनच्या काळाचा लाभ घेत आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मार्चपासूनच शहरातील नद्यांची स्वच्छता सुरू केली. गेल्या दोन महिन्यांत स्वच्छतेमुळे नाग नदीचे रुपडे पालटले.

नागपूर : धडाकेबाज अधिकारी म्हणून ओळखले जाणारे नागपूरचे मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नुकताच एक व्हिडिओ ट्विट केला. याद्वारे शहरातील नाग नदी स्वच्छतेचे काम कशाप्रकारे करण्यात आले हे दाखवण्यात आले. या ट्विटमध्ये राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना टॅग केले होते. त्यामुळे आदित्य ठाकरेंनी मुंढेंचे कौतुक करून नाग नदी स्वच्छला उपक्रमाला आपले पाठबळ असल्याचे रिट्विट केले.

शहरातील नाग नदीची स्वच्छता दरवर्षी केली जाते. मात्र, यंदा नाग नदीचे पात्र रुंदच नव्हे तर खोलही करण्यात आले. त्यामुळे पावसाळ्यात पावसाचे पाणी काठांवरील नागरिकांच्या घरापर्यंत जाण्याऐवजी थेट शहराबाहेर वाहून जाणार आहे. त्यामुळे किनाऱ्यावरील नागरिकांना यंदा दिलासा मिळणार आहे. लॉकडाऊनच्या काळाचा लाभ घेत आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मार्चपासूनच शहरातील नद्यांची स्वच्छता सुरू केली. गेल्या दोन महिन्यांत स्वच्छतेमुळे नाग नदीचे रुपडे पालटले. नाग नदी स्वच्छतेचे चित्रिकरण करण्यात आले. त्यातून नाग नदीचे सौंदर्य अनेकांना मोहात पाडत आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी हा व्हिडिओ ट्विटरवर 'शेअर' केला.

हा व्हिडीओ त्यांनी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनाही 'टॅग' केला. तासाभरातच पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी नाग नदी स्वच्छतेचा आणि नाग नदीच्या खुललेल्या सौंदर्याचा व्हीडीओ बघितला. त्यांनी नाग नदीच्या पुनरुज्जीवनासाठी सरकार वचनबद्ध असल्याचे नमूद करीत या नदीच्या पुनरुज्जीवनाला वर्षाच्या सुरुवातीलाच मान्यता दिल्याचेही सांगितले. नाग नदीच्या पुनरुज्जीवनावर पर्यावरणमंत्र्यांच्या ट्विटमुळे मुंबई व पुण्यातील नागरिकांनी त्यांच्या शहरातील नद्यांचे प्रश्‍न उपस्थित केले. मुंबईकरांनी उल्हास, मिठी नदीबाबत तर पुणेकरांनी मुळा, मुठा नदीबाबत प्रश्‍न उपस्थित केले.

पर्यटनाच्या दृष्टीने होणार समृद्ध - आयुक्त

नाग नदीच्या रूपाने नागपूरची संस्कृती जपण्यासाठी आणि नदीचे किनारे पर्यटनाच्या दृष्टीने समृद्ध करण्याचा प्रयत्न महानगरपालिकेने नदी स्वच्छता अभियानाच्या निमित्ताने सुरू केला आहे. काढलेला गाळ नदीच्या संरक्षण भिंतीला लावून न ठेवता तो इतरत्र टाकण्यात आला. त्यामुळे यावर्षी पूरसदृश परिस्थिती निर्माण होणे शक्‍यच नाही, असा दावा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी फेसबुकवरील पोस्टमधून केला आहे. ही केवळ स्वच्छता झाली. आता नाग नदीचे सौंदर्य वाढविण्याच्या दृष्टीने काम सुरू झाल्याचे आयुक्तांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: aditya thackrey tweet about nag river