esakal | नाशिकनंतर नागपुरातही आयुक्त मुंढे समर्थक रस्त्यांवर
sakal

बोलून बातमी शोधा

After Nashik, Commissioner Mundhe supporters on the streets in Nagpur also

मागील महिन्यात पाचदिवसीय सर्वसाधारण सभेदरम्यान सेना, मनसे, आप आणि कॉंग्रेसच्या दोन नगरसेवकांनीही आयुक्तांच्या समर्थनात सभागृहाबाहेर हजेरी लावून समर्थनात घोषणा दिल्या होत्या. दरम्यान, आज कॉंग्रेसचे नगरसेवक कमलेश चौधरी यांनी समर्थकांसह पालिकेत येऊन आयुक्तांच्या समर्थनात घोषणा दिल्या. त्यांनी नागरिकांसह आयुक्तांची भेटही घेतली. 

नाशिकनंतर नागपुरातही आयुक्त मुंढे समर्थक रस्त्यांवर

sakal_logo
By
राजेश प्रायकर

नागपूर : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यासाठी रस्त्यावर येण्याची तयारी समर्थकांनी सुरू केली. सोशल मीडियावरून नागरिकांनाही समर्थनात पुढे येण्याचे आवाहन केले. त्यामुळे दोन वर्षांपूर्वी नाशिकमध्ये जे घडले, त्याची पुनरावृत्ती नागपुरात होण्याची शक्‍यता बळावली आहे. दरम्यान, आज एका नगरसेवकाने पालिकेत नागरिकांसह आयुक्तांच्या समर्थनात घोषणाबाजी केली अन्‌ आयुक्तांची भेट घेऊन पाठिंबा दिला. 

महापालिकेत आयुक्तविरुद्ध सत्ताधारी, असा सामना रंगला आहे. स्मार्ट सिटी सीईओपदावरून सत्ताधाऱ्यांची सरशी झाल्याने आयुक्त मुंढे समर्थक पुन्हा एकदा सोशल मीडियावर सक्रिय झाले आहेत. मुंढे यांच्या समर्थनात रस्त्यावर येण्याची तयारी समर्थकांनी सुरू केली आहे.

त्यांचे समर्थक माजी नगरसेवक व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते वेदप्रकाश आर्य यांनी सोशल मीडियावर आयुक्तांच्या समर्थनात रस्त्यावर येण्याचे नागरिकांना आवाहन केले आहे. आयुक्तांच्या समर्थनात येण्यासाठी त्यांनी संविधान चौक निश्‍चितही केले आहे. त्यांनी नागरिकांसाठी दोन मोबाईल फोन क्रमांक उपलब्ध करून दिले असून, रस्त्यावर येण्यास इच्छुकांनी कॉल करावा, असे आवाहन केले आहे.

ही पोस्ट फेसबुक आणि व्हॉट्‌सऍपवर व्हायरल करण्यात आली आहे. फेसबुकवर अनेक नागरिकांनी ही पोस्ट "लाइक' केली आहे. विशेष म्हणजे अनेकांनी कोरोनापासून शहरवासींच्या बचावासाठी केलेल्या कामाबाबत आयुक्तांचे अभिनंदन केले आहे. काहींनी "हम भी तयार हैं', असेही पोस्ट केले आहे. कालपासून ही पोस्ट सोशल मीडियावर झळकत आहे.

गेल्या चौदा वर्षांपासून पालिकेत भाजपची सत्ता आहे. आयुक्त मुंढे आल्यानंतर सत्ताधाऱ्यांचे विरोधक आता सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. एकूणच आयुक्त मुंढे आल्यानंतर सत्ताधाऱ्यांच्या विरोधकांच्या आत्मविश्‍वासात वाढ झाल्याचे चित्र आहे. सोशल मीडियातून अनेकांनी सत्ताधाऱ्यांवर बोचरी टीका केली.

..तर शहरात पुन्हा "लॉकडाउन'! वाचा नेमके काय म्हणाले तुकाराम मुंढे

मागील महिन्यात पाचदिवसीय सर्वसाधारण सभेदरम्यान सेना, मनसे, आप आणि कॉंग्रेसच्या दोन नगरसेवकांनीही आयुक्तांच्या समर्थनात सभागृहाबाहेर हजेरी लावून समर्थनात घोषणा दिल्या होत्या. दरम्यान, आज कॉंग्रेसचे नगरसेवक कमलेश चौधरी यांनी समर्थकांसह पालिकेत येऊन आयुक्तांच्या समर्थनात घोषणा दिल्या. त्यांनी नागरिकांसह आयुक्तांची भेटही घेतली. 

दोन वर्षांपूर्वी नाशिक, आता नागपुरात 
मुंढे यांच्यावर अविश्‍वास आणल्याने तत्कालीन सत्ताधाऱ्यांविरोधात ऑगस्ट 2018 मध्ये नाशिककरांनी रस्त्यांवर येऊन घोषणाबाजी केली होती. तेथील पोलिस प्रशासनाने मोर्चाला परवानगी नाकारल्यानंतरही नागरिक रस्त्यांवर उतरले होते. नाशिकचीच पुनरावृत्ती नागपुरात होणार असल्याचे दिसून येत आहे.