टी-२० नंतर आता होणार टी-१० चा धमाका ! युवा खेळाडूंसाठी सुवर्णसंधी 

file photo
file photo

नागपूर  : ५० षटकांच्या आंतरराष्ट्रीय सामन्यानंतर टी-२० ने जगभरातील क्रिकेटप्रेमींना भुरळ पाडल्यानंतर आता लवकरच क्रिकेटचा नवा छोटा धमाका टी-१० येतो आहे. मनोरंजनाचा अस्सल तडका लावण्यात आलेल्या या झटपट क्रिकेटच्या माध्यमातून विदर्भ व महाराष्ट्रातील शेकडो युवा खेळाडूंसाठी करिअरचे नवे दालन उघडणार आहे. 


क्रिकेटची भारतातील अफाट लोकप्रियता बघता या खेळाचेही हळूहळू स्वरूप बदलत आहे. एकेकाळी ५० षटकांचे सामने प्रचंड लोकप्रिय होते. त्यानंतर मधल्या काळात २० षटकांच्या सामन्यांची चलती आली. आता महाराष्ट्र टी-१० आंतरराष्ट्रीय ग्रासरूट क्रिकेटर्स असोसिएशनच्या माध्यमातून टी-१० सामने येत आहेत. राष्ट्रीय टी-१० आंतरराष्ट्रीय ग्रासरूट क्रिकेटर्स असोसिएशनचे अध्यक्ष तपन सरकार यांनी शुक्रवारी अध्यक्ष शैलेंद्र तिवारी व सहसचिव रोहितकुमार मिश्रा यांच्या नेतृत्वाखाली राज्य संघटनेची औपचारिक घोषणा केली. ही संघटना संपूर्ण महाराष्ट्रात टी-१०चा प्रचार व प्रसार करणार आहे. 


या नव्या फॉरमॅटबद्दल 'सकाळ'शी बोलताना सहसचिव रोहितकुमार मिश्रा म्हणाले, क्रिकेटप्रेमींकडे आता पूर्वीसारखा वेळ नसल्यामुळे त्यांना फटाफट मनोरंजनाची आवश्यकता भासू लागली आहे. त्यांची ही गरज लक्षात घेऊनच टी-१० सामने सुरू करण्यात येत आहे. यात सर्वप्रथम युवा क्रिकेटपटूंना जिल्हा संघटनेमार्फत सहा महिन्यांसाठी माफक शुल्क देऊन आपापली नोंदणी करावी लागणार आहे. नोंदणीकृत खेळाडूंची जिल्हा स्तरावर एक भव्य स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. यात चमकदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची राज्य आंतरजिल्हा क्रिकेट स्पर्धेसाठी निवड होणार आहे. त्यानंतर राज्य स्पर्धेतून राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ निवडण्यात येणार आहे. पुढे भविष्यात खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. उल्लेखनीय म्हणजे स्पर्धेचे युट्यूबवरून थेट प्रक्षेपण होणार आहे. आकर्षक बक्षिसेही राहणार आहेत. 


टी-१०च्या निमित्ताने शहरी व ग्रामीण भागातील १४, १७, १९ आणि खुल्या गटातील क्रिकेटची आवड असलेल्या युवा खेळाडूंना एक उत्तम व्यासपीठ मिळणार आहे. शिवाय त्यांना भविष्यात क्रिकेटमध्ये कारकीर्द करण्याचीही सुवर्णसंधी लाभणार आहे. व्यावसायिक तसेच हौशी कोणताही क्रिकेटपटू यात सहभागी होऊ शकणार आहे. भारत, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, मलेशिया, नेपाळसह अनेक देशांमध्ये सध्या टी-१० क्रिकेट खूप लोकप्रिय असून, हे सर्व देश आंतरराष्ट्रीय टी-१० क्रिकेट संघटनेशी जुळले असल्याचे मिश्रा यांनी सांगितले.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com