कृषी पर्यटन देईल  शेतकऱ्यांना नवसंजीवनी 

राजेश रामपूरकर
Friday, 9 October 2020

भारतात कृषी पर्यटन सुरू करणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य ठरले आहे. आजच्या स्थितीत ५०० पेक्षा अधिक कृषी पर्यटन केंद्र अस्तित्वात आहेत. कृषी पर्यटन हे गावाला पूरक व्यवसायाचे जाळे निर्माण करणारा शेतीवर आधारित उपक्रम आहे. यामुळेच राज्य सरकारनेही गांभीर्याने घेतले असून विशेष धोरण जाहीर केले आहे.

नागपूर :  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जवळच्या पर्यटन स्थळांकडे जाणाऱ्यांची संख्या वाढू लागली असताना राज्य शासनाने कृषी पर्यटन धोरण जाहीर केले आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना पूरक व्यवसाय उपलब्ध होणार असून शहरी पर्यटकांना शांत, निसर्गसंपन्न ठिकाणी राहून पर्यटनाचा आनंद मिळू शकणार आहे. 

भारतात कृषी पर्यटन सुरू करणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य ठरले आहे. आजच्या स्थितीत ५०० पेक्षा अधिक कृषी पर्यटन केंद्र अस्तित्वात आहेत. कृषी पर्यटन हे गावाला पूरक व्यवसायाचे जाळे निर्माण करणारा शेतीवर आधारित उपक्रम आहे. यामुळेच राज्य सरकारनेही गांभीर्याने घेतले असून विशेष धोरण जाहीर केले आहे. यातून कृषी पर्यटनातून ग्रामीण विकास, शेती उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे, ग्रामीण भागातील लोककला आणि परंपरा यांचे दर्शन घडविणे, कृषी पर्यटनाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील राहणीमान उंचावणे, पर्यटकांना प्रदूषणमुक्त व शांत निसर्गरम्य सांनिध्यात राहण्याचा अनुभव देणे, पर्यटकांना प्रत्यक्ष शेतीच्या कामाचा अनुभव देणे हा मुख्य उद्देश आहे. 

ठळक बातमी - जेवताना पोळी कधी आणि किती खावी? जाणून घ्या आहारतज्ज्ञ डॉ. कविता गुप्ता यांच सल्ला
 

कृषी पर्यटन शेती आणि शेतीवर आधारित असल्यामुळे कृषी पर्यटन सुरू करण्यासाठी कमीत कमी एक एकर किंवा त्यापेक्षा अधिक शेती क्षेत्र असणे आवश्यक आहे. ज्या कृषी पर्यटन केंद्रात शालेय सहली आयोजित करण्यात येणार आहे. त्या केंद्रांचे क्षेत्र हे कमीत कमी पाच एकर असावे. इयत्ता पाचवी ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी अशा केंद्रांना किमान एक शैक्षणिक सहल आयोजित करावी लागणार आहे. कृषी पर्यटन केंद्र चालकांना पर्यटकांना एक दिवसीय सहल, निवास व्यवस्था, मुलांना खेळण्यासाठी जागा, साहसी खेळ, ग्रामीण खेळ आदींचा समावेश असावा. तंबू निवाऱ्याची सोय करता येणार आहे. तसेच भोजन व्यवस्था व स्वयंपाक घर असावे. कृषी पर्यटन सुरू करण्यासाठी पर्यटन संचालनालयात नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. नोंदणीसाठी www.maharashtratourism.gov.in या संकेत स्थळावर व प्रादेशिक उपसंचालक पर्यटन संचालनालय कार्यालयात अर्ज करता येणार आहे. 

पर्यटन विभागात नोंदणी करा

नोंदणी केलेल्या कृषी पर्यटन केंद्रास पर्यटन विभागाकडून नोंदणी प्रमाणपत्र मिळणार आहे. या केंद्रांना वस्तू व सेवा कर, विद्युत शुल्क इतरचा लाभ मिळणार आहे. कृषी पर्यटनाची चांगली छायाचित्रे, व्हीडिओ पर्यटन संचालनालयास दिल्यास त्याची प्रसिद्धी विविध माध्यमांतून करण्यात येणार आहे. हनुमंत हेडे , प्रादेशिक उपसंचालक (अमरावती). 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Agri Tourism Will Provide Revitalization of Farmers