ऐन हंगामात शेतकरी विचारतात, कुठे गेला युरिया?

file
file

जलालखेडा (जि.नागपूर): खरीप पिके जोमात असून आता पिकांना युरिया खताची गरज आहे. हे ओळखून शेतकरी युरियाची मागणी करीत आहेत, पण नरखेड तालुक्यात युरिया खताची टंचाई निर्माण झाली आहे. युरिया खताच्या गोणीची काही दुकानदार तालुक्यात जादा दराने विक्री करीत असल्याची चर्चा तालुक्यात रंगली आहे. तसेच युरियासोबत लिंकिंग करत अन्य खते खरेदी करण्याचा आग्रह देखील केला जात असल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. पण या तक्रारी कृषी विभागाकडे केल्या जात नसल्यामुळे असा गोरखधंदा करणाऱ्याचे चांगलेच फावत आहे.  काही दुकानदार शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे चित्र ही तालुक्यात आहे. मात्र युरिया मिळत नसल्याने सध्या जोमात असलेल्या कापसाचे पीक वाया तर जाणार नाही ना, या चिंतेने शेतकरी हतबल झाले आहेत.

अधिक वाचाः सरकारी जमिनींवर अतिक्रमणाचा बोलबाला, बसस्थानकाच्या इमारतीचे काय झाले बोला !

जादा किंमत मोजावी लागतेय
 नरखेड तालुक्यात यावर्षी ४७ हजार हेक्टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी करण्यात आली होती. यात मका, तूर, मूग, उडीद, ज्वारी, सोयाबीन या पेरणीचा समावेश आहे. पण हे आधीच अति पावसामुळे शेतकऱ्यांच्या हाती लागले नाही. यात सर्वात जास्त सोयाबीन पिकाचे झाले. १३ हजार हेक्टरमधील सोयाबीनचे १०० टक्के नुकसान झाले. यामुळे आता सर्वच शेतकऱ्यांच्या अशा या कापसाच्या पिकाकडे लागल्या आहेत. यावर्षी तालुक्यात २०५९३ हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड करण्यात आली आहे. सध्या कापसाचे पीक जोमात असून पाऊसही चांगला पडत असल्याने शेतकरी समाधानी आहेत. मात्र सध्या पिकांना युरियाची गरज असताना तो मात्र मिळत नसल्याचे चित्र आहे. अनेक ठिकाणी उपलब्ध असूनही युरिया दिला जात नाही. काही ठिकाणी जादा किंमत मोजावी लागतेय तर काही ठिकाणी युरियासोबत अन्य खते खरेदी करण्याची सक्ती केली जातेय.

अधिक वाचाः अकस्मात झालेल्या बदलीने बसला धक्का, तहसीलदारांची मॅट’कडे धाव

कृषी विभाग प्रशासन कार्यवाही करण्यास हतबल
खतांचा काळाबाजार होऊ नये म्हणून तालुक्यांत भरारी पथके नियुक्त करण्यात आली आहे. तरी पण शेतकऱ्यांच्या गरजेचा लाभ उचलत काही दुकानदार आपला फायदा साधत आहे. शेतकरी असे खासगीत सांगत असला तरी तक्रार करीत नाही किंवा त्याच्याजवळ पुरावा नसल्यामुळे तो काहीच करीत नाही. म्हणून कृषी विभाग आणि प्रशासनाकडून कार्यवाही करण्यास हतबल असल्याचे चित्र आहे. इतर रासायनिक खतांपेक्षा युरिया खात हे स्वस्त असून त्यात नायट्रोजनचे प्रमाण जास्त आहे. एक क्विंटल खतामध्ये ४६ टक्के नायट्रोजन असून शेतकरी कापसाच्या पिकासाठी दुसऱ्या व तिसऱ्या डोज देण्यासाठी युरीयाला पसंती देतात. पण आता हे खत मिळत नसल्यामुळे शेतकरी खतासाठी पायपीट करीत असल्याचे तालुक्यात चित्र आहे.
       

तक्रार मिळताच चौकशी करू!
एक दोन दिवसात तालुक्यात खत येणार देखील आहे. पण याचा कुणी दुकानदार लाभ घेऊन शेतकऱ्यांकडून जादा पैसे घेत असेल तर त्याची तक्रार मिळताच चौकशी करण्यात येईल व वेळ पडल्यास विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत खताची विक्री केली जाईल.
डॉ. योगीराज जुमडे
तालुका कृषी अधिकारी, नरखेड

संपादनःविजयकुमार राऊत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com