सलून उघडण्यास परवानगी द्या, अन्यथा...

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 9 जून 2020

लॉकडाउनमुळे सलून बंद असल्यामुळे नाभिक समाजावर संकट कोसळले आहे. सलून व्यवसायी अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे सलून, ब्युटी पार्लत व्यवसाय सुरू करण्यास परवानगी द्या किंवा प्रत्येक सलून व्यावसायिकाला महिना 15 हजार रुपये आर्थिक साहाय्य करा, अशी मागणी नाभिक एकता मंचने केली आहे.

नागपूर : लॉकडाउनमुळे सलून चालक, मालक आणि कारागिरांवर उपासमारीची वेळ आली आहे. 
त्यामुळे नाभिक समाजाने आता संघर्षाचा पवित्रा घेतला आहे. सलून उघडण्यास परवानगी द्या अथवा महिना 15 हजार रुपये द्या, अशी मागणी नाभिक एकता मंचने सरकारकडे केली आहे. अन्यथा राज्यात 11 जून रोजी 'मूक आंदोलन' करण्याचा इशारा दिला आहे. 

लॉकडाउनमुळे सलून बंद असल्यामुळे नाभिक समाजावर संकट कोसळले आहे. सलून व्यवसायी अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे सलून, ब्युटी पार्लत व्यवसाय सुरू करण्यास परवानगी द्या किंवा प्रत्येक सलून व्यावसायिकाला महिना 15 हजार रुपये आर्थिक साहाय्य करा, अशी मागणी नाभिक एकता मंचने केली आहे. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा मंचने दिला आहे. 

कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सलून व ब्युटी पार्लर व्यवसाय 19 मार्चपासून बंद आहे. लॉकडाउनच्या कालावधीत सरकारच्या सर्व नियम व अटींचे पालन करीत असताना आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या सलून चालकांवर उपासमारीची वेळ आली. मात्र, त्यानंतरही सलून व्यावसायिकांनी आपले व्यवसाय बंद ठेवून सरकारला मदत केली. नाभिक समाजावर आलेले आर्थिक संकट अधिकच गडद झालेले आहे. 
नाभिक एकता मंचच्या वतीने शासनास जिल्ह्यातील नाभिक एकता मंचच्या सर्व कार्यकारिणींद्वारे निवेदन देऊन सलून व्यवसायिकांना मदत करण्याची मागणी केली होती. परंतु, दखल घेण्यात आली नाही. 

हेही वाचा : अमरावतीत कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू; एकूण मृत्यू सतरा

शासनास स्मरण करून देण्यासाठी वारंवार निवेदन देण्यात आले. मात्र, सलून व्यावसायिकांना व्यवसाय सुरू करण्याची परवानगी दिली नाही तसेच आर्थिक मदतसुद्धा करण्यात आली नाही. अशा परिस्थितीत नाभिक समाजाला मदतीची अपेक्षा होती. मात्र, सरकारने दुर्लक्ष केले आहे. 
सरकारने 10 जूनपर्यंत सलून दुकान सुरू करून आर्थिक मदत द्यावी किंवा प्रत्येक सलून व्यावसायिकाला दरमहा 15 हजार रुपयांची मदत करावी, अशी मागणी मंचच्या वतीने करण्यात आली. मागणी पूर्ण न झाल्यास 11 जून रोजी 11 ते 2 या वेळेत नाभिक एकता मंचच्या वतीने राज्यभर नाभिक समाज आपल्या व्यवसायस्थळी मूक आंदोलन करेल, असा इशारा देण्यात आला याबाबतचे निवेदन मुख्यमंत्र्यांच्या नावे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे, अशी माहिती नाभिक एकता मंचचे अध्यक्ष धनराज वलुकार यांनी दिली. 
 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Allow the saloon to open