बनावट प्रमाणपत्र प्रकरणी आणखी एकास अटक, मानकापूर पोलिसांची कारवाई

नरेंद्र चोरे
Tuesday, 3 November 2020

३० वर्षीय गाडे राहुरी कृषी विद्यापीठामध्ये चतूर्थ श्रेणी मजुराची नोकरी करतो. मजुरी करीत असतानाच तो बोगस प्राविण्य प्रमाणपत्रांची विक्री करणाऱ्या रॅकेटमध्ये सहभागी झाला. अंकुश राठोडसह चौकडीसोबत त्याने या बाजारात आपला चांगलाच जम बसवला. मजूर असल्याने त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा संशय घेतल्या जात नव्हता. मात्र, तो आपल्या तगड्या संपर्कातून बोगस उमेदवार शोधून काढायचा आणि लाखो रुपये देणारे गिऱ्हाईक मिळवायचा.

नागपूर  : बनावट क्रीडा प्रमाणपत्र प्रकरणी मानकापूर पोलिसांची धडक कारवाई सुरूच असून, आणखी एका म्होरक्याला अहमदनगर येथून अटक करण्यात आली आहे. रमेश गाडे असे या आरोपीचे नाव आहे. 

राहुरी कृषी विद्यापीठामध्ये मजुरीचे काम करणाऱ्या गाडेने बोगस प्राविण्य प्रमाणपत्रांचा बाजार मांडून लाखो रुपयांची माया जमविल्याची माहिती आहे. तपासात त्याचे नाव पुढे आल्यानंतर तपास अधिकारी पोलिस निरिक्षक कृष्णा शिंदे यांच्या मार्गदर्शनात मानकापूर पोलिसांनी २६ तास व १५०० किमीच्या मॅरेथॉन प्रवासानंतर अहमदनगर जिल्ह्यातील टाकळी वहान (ता. श्रीरामपूर) येथून गाडेला ताब्यात घेतले. यावेळी मारलेल्या छाप्यात पोलिसांनी त्याच्या घरून अनेक कागदपत्रे, आधारकार्ड आणि पाच क्रीडा प्रकारांतील बोगस प्राविण्य प्रमाणपत्रे जप्त केली.

 

हेही वाचा : *माजी उपसंचालक व क्रीडा अधिकाऱ्याने बनवले नातेवाइकांचे बोगस प्रमाणपत्र !*
 

 

३० वर्षीय गाडे राहुरी कृषी विद्यापीठामध्ये चतूर्थ श्रेणी मजुराची नोकरी करतो. मजुरी करीत असतानाच तो बोगस प्राविण्य प्रमाणपत्रांची विक्री करणाऱ्या रॅकेटमध्ये सहभागी झाला. अंकुश राठोडसह चौकडीसोबत त्याने या बाजारात आपला चांगलाच जम बसवला. मजूर असल्याने त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा संशय घेतल्या जात नव्हता. मात्र, तो आपल्या तगड्या संपर्कातून बोगस उमेदवार शोधून काढायचा आणि लाखो रुपये देणारे गिऱ्हाईक मिळवायचा. झटपट आणि कोणत्याही मेहनतीशिवाय कोट्यावधीची माया मिळत असल्याने गाडेने पोलिस दलातील कॉन्स्टेबलची आणि एसटी महामंडळातील क्लार्कची नोकरी सोडून दिली. कोणालाही या प्रकरणी संशय येऊ नये म्हणून त्याने विद्यापीठात मजूर म्हणून नोकरी मिळवली. गाडेने औैरंगाबादसह नाशिक व पुणे या मोठ्या शहरांमध्ये बोगस प्राविण्य प्रमाणपत्राचे मार्केट तयार केले होते. या सर्वांनीच बनावट प्रमाणपत्रांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची कमाई केलेली आहे. 

या रॅकेटचा मुख्य सुत्रधार अंकुश राठोडला यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील आणखी दोन आरोपी फरार असून, त्यांचाही पोलिस कसून शोध घेत आहेत. औैरंगाबादसह पुणे, नाशिक व आसपासच्या जिल्ह्यातील अनेक शहरांमध्ये बोगस प्राविण्य प्रमाणपत्रांचे मोठे मार्केट सुरू आहे. यात अंकुश, बारगजे, पंतगे आणि बीडचा कृष्णा जायभाये अधिक सक्रिय होते. या ठिकाणावरून मोठ्या प्रमाणात बोगस प्राविण्य प्रमाणपत्रांची विक्री करण्यात आली आहे. बोगस प्रमाणपत्रांच्या माध्यमातून आतापर्यंत ३२ जणांनी शासकीय नोकऱ्या लाटल्याची माहिती मिळाली आहे. दैनिक 'सकाळ' ने हे गंभीर प्रकरण उचलून धरले आहे. 

संपादन : नरेश शेळके 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Another Arrested in Fake Certificate Case by Mankapur Police