'पैसे वापस चाहिये या जान', अशी धमकी द्यायचा शिवसेनेचा शहरप्रमुख; वाचा कच्चाचिठ्ठा 

अनिल कांबळे
बुधवार, 1 जुलै 2020

शिवसेनेचा शहर प्रमुख मंगेश कडव याच्याविरुद्ध अनेक तक्रारी पोलिसांकडे येत आहेत. प्रीती दासनंतर मंगेश कडव याच्याही गुन्हेगारी जगताचा पाढा वाचला जात आहे. आपल्या पक्षातील काही पदाधिकाऱ्यांना हाताशी धरून कोटींमध्ये खंडणी मागण्याचे प्रकार मंगेश कडव करीत आहे.

नागपूर : शिवसेनेचा शहर प्रमुख खंडणीबाज मंगेश कडव याच्या गुन्हेगारी पापाचा घडा भरला असून, तो पोलिसांच्या रडारवर आहे. मंगेश कडव याने एका फ्लॅटची 15 लाखांत विक्री केल्यानंतर ताबा देण्यासाठी टाळाटाळ करीत फसवणूक केली. याप्रकरणी तक्रारीवरून हुडकेश्‍वर पोलिसांनी मंगेश कडव आणि त्याची पत्नी रूचिता कडव या दोघांविरूद्ध गुन्हे दाखल केले आहेत. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेनेचा शहर प्रमुख मंगेश कडव याच्याविरुद्ध अनेक तक्रारी पोलिसांकडे येत आहेत. प्रीती दासनंतर मंगेश कडव याच्याही गुन्हेगारी जगताचा पाढा वाचला जात आहे. आपल्या पक्षातील काही पदाधिकाऱ्यांना हाताशी धरून कोटींमध्ये खंडणी मागण्याचे प्रकार मंगेश कडव करीत आहे. शिवसेनेचा वादग्रस्त नेता असलेला मंगेश कडव जीवे मारण्याच्या धमक्‍या देऊन प्रॉपर्टी हडप करीत आहे.

हेही वाचा - 'माया भाई' म्हणून मिरवायचा, विरोधकांना खटकायचे, त्यातूनच घडला हा प्रकार...

मंगेश सध्या गुंडगिरी करीत गुन्हेगारी जगतातसुद्धा सक्रिय आहे. मंगेशविरुद्ध सध्या अंबाझरी आणि सक्‍करदरा पोलिस ठाण्यात दीड कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत. तर तिसरा फसवणुकीचा गुन्हा हुडकेश्‍वरमध्ये दाखल आहे. पोलिस ठाण्यात दाखल तक्रारीनुसार, जुना सुभेदार ले-आउट येथे राहणारे दिनेश रामचंद्र आदमने आणि आरोपी मंगेश कडव आणि त्याची आरोपी पत्नी रुचिता एकमेकांना गेल्या सात ते आठ वर्षांपासून ओळखतात. 

1 नोव्हेंबर 2013 रोजी दिनेश यांनी मानेवाडा रोडवरील अमरिती अपार्टमेंटमधील मंगेशचा फ्लॅट 16 लाख रुपये देऊन खरेदी केल्याचा करारनामा केला होता. दिनेश यांनी मंगेश कडवला साडेबारा लाख रुपये नगदी आणि अडीच लाख रुपयांचा धनादेश दिला होता. त्यानंतर मंगेश कडव व त्याची पत्नी रुचिता या दोघांनी फ्लॅटचा ताबा देण्यास टाळाटाळ केली. सेलडीड करून न देता वारंवार चालढकल केली. मंगेश कडवने मे. रामसीटी युनियन फायनान्स लिमीटेड येथे तोच फ्लॅट काही लाख रुपयांत गहाण ठेवला. तो फ्लॅट थेट पत्नी रुचिता कडव हिच्या नावावर सेलडीड करण्यात आला. 

दिनेश आदमने मंगेश कडव याच्या बजाजनगरातील कार्यालयात गेले. मंगेशला पैसे परत मागितले असता "शिवसेना पार्टी फंड दिया समजके अब तू पैसे भूल जा... पैसे वापस चाहिये या जान प्यारी हैं' अशी धमकी मंगेश कडवने दिली. त्यामुळे घाबरलेले दिनेश परत आले. त्यानंतर मंगेशने दिनेश यांना अनेदा जीवे मारण्याची धमकी दिली. 
 

चेक देऊन पेमेंट थांबविले 

दिनेश यांनी पैसे परत मागितले असता मंगेश कडव धमक्‍या द्यायला लागला. शिवसेना नेता असल्याचे सांगून दमदाटी करायला लागला. 15 लाख रुपये परत देण्याचे आमिष दाखवून दिनेश यांना पाच लाख रुपयांचा बॅंक ऑफ महाराष्ट्राचा चेक दिला. मात्र, तो चेक घेऊन दिनेश बॅंकेत गेले असता मंगेशने बॅंकमध्ये स्टॉप पेमेंटचा अर्ज केला. त्यामुळे दिनेश यांना पैसे मिळू शकले नाही. अशाप्रकारे दिनेश आदमने यांची फसवणूक केली. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Another case against Shiv Sena city chif Mangesh Kadav