तृतीयपंथीयांच्या कल्याण मंडळावर यांची झाली नियुक्‍ती...

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 जून 2020

भाजप सत्तेत असताना तत्कालीन महिला आणि बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांनी योजनेसंदर्भात महाराष्ट्र तृतीयपंथीय संघटनेसोबत बैठक घेतली. तृतीयपंथींयांना लाभ मिळवून देण्यास आपला विभाग सर्वोतपरी मदत करेल, असा विश्‍वास दिला होता.

नागपूर : तृतीयपंथीयांना किन्नर, हिजडा अशा वेगवेगळ्या नावाने हाक मारण्यात येते. पेहरावावरून थट्टाही केली जाते. तृतीयपंथीयांचं नटणं हे त्यांच्या पोटासाठी असते. परंतु ते हेटाळणीचा विषय बनतात. तृतीयपंथीयांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. तत्कालीन कॉंग्रेस-राष्ट्रवादी सरकारने 2014 मध्ये तृतीयपंथीय कल्याणकारी मंडळ (टीडब्ल्यूबी) स्थापन करण्याची घोषणा केली. राज्यात सत्ताबदल झाला. परंतु, भारतीय जनता पार्टीने तृतीयपंथीयांच्या कल्याण मंडळाची पाच वर्षे टोलवाटोलवी केली. अखेर शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसचे सरकार राज्यात आल्यानंतर हे मंडळ तयार झाले. नागपूरच्या तृतीयपंथीय राणी ढवळे यांची या मंडळावर नियुक्ती झाली.

नागपुरातील सीताबर्डीत येथील दुकानात जाताय... जरा सावधान

कॉंग्रेस सरकार केंद्रात असताना त्यांनी अशाप्रकारचे मंडळ तयार करण्याची घोषणा केली होती. परंतु, केंद्र आणि राज्यातही सत्ताबदल झाल्याने मंडळाला आकार देता आला नाही. या कल्याणकारी मंडळांच्या माध्यमातून त्यांच्या हिताच्या विविध योजनांची अंमलबजावणी करण्याचे काम राज्य शासनाकडून करण्यात येईल. त्यावेळी कॉंग्रेस-राष्ट्रवादी सरकारने 2013 मध्ये राज्याच्या महिला धोरणात तृतीयपंथीयांसाठी कल्याणकारी मंडळ तयार करण्याचा तसेच त्यांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी कल्याणकारी योजनांचा समावेश केला होता.

भाजप सत्तेत असताना तत्कालीन महिला आणि बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांनी योजनेसंदर्भात महाराष्ट्र तृतीयपंथीय संघटनेसोबत बैठक घेतली. तृतीयपंथींयांना लाभ मिळवून देण्यास आपला विभाग सर्वोतपरी मदत करेल, असा विश्‍वास दिला होता. मात्र, पुढे कल्याणकारी मंडळ तयार करण्याचे काम थंडबस्त्यात गेले. तृतीयपंथीयांच्या कल्याणकारी मंडळाचा विषय सामाजिक न्याय विभागाकडे वळता केला गेला. जानेवारी 2018 मध्ये राज्याचे समाजकल्याण मंत्री दिलीप कांबळे यांनी पंधरा दिवसांत मंडळाची स्थापन होईल, अशी घोषणा करीत 5 कोटींची तरतूद केली जाईल, असे सांगितले होते.

मात्र, दोन वर्षे उलटूनही तृतीयपंथीयांचे कल्याण मंडळ कागदावरच राहिले. अखेर सरकार गेले. महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले आणि नुकतेच 8 जून 2020 रोजी राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाने अद्यादेश काढून राज्यभरातील सदस्यांची नियुक्ती केली. सामाजिक न्यायमंत्री मंडळाचे अध्यक्ष, तर राज्यमंत्री सह-अध्यक्ष आहेत. या विभागाचे सचिव उपाध्यक्ष आहेत. किन्नर मॉं संस्थेच्या अध्यक्ष सलमा खान मंडळाच्या सह-उपाध्यक्ष आहेत.

आमदार विद्या चव्हाण, ऍड. दिलशाह इलाही मुजावर, डॉ. शुभांगी पारकर, वर्षा विद्या विलास, गौरी सावंत, चांदनी शेख यांच्यासह शासनाच्या विविध विभागाचे उप-सचिवांसह बार्टीचे महासंचालक, डॉ. आंबेडकर प्रतिष्ठानचे व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र एड्‌स नियंत्रण मंडळाचे संचालक, प्रिया पाटील, पवित्रा निंभोरकर, राणी ढवळे (नागपूर), चिमा गुरू, दिशा पिंकी शेख, मयूरी आवळेकर, समाजकल्याण विभागाचे आयुक्त यांची या मंडळावर सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.

 
तीन लाख तृतीयपंथीयांना होणार लाभ

तृतीयपंथीयांना सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यासोबतच तृतीयपंथीयांचे शिक्षण, रोजगार, स्वयंरोजगार, निवासाची धोरणे राबविण्यासंदर्भातील विषयांचा या मंडळात समावेश आहे. आरोग्य योजनांचा लाभ या कल्याण मंडळामार्फत तृतीयपंथीयांना उपलब्ध करून देण्याची शिफारस आहे. घटनात्मक आणि मानवी अधिकारांच्या संरक्षणासह सन्मानपूर्वक वागणूक मिळावी, अशी शिफारस या मंडळात नमूद आहेत. राज्यात 3 लाख तृतीयपंथीयांना या मंडळाचा लाभ होणार आहे. सरकारचे अभिनंदन.
राणी ढवळे, अध्यक्ष-किन्नर विकास बहुद्देशीय सामाजिक संस्था, नागपूर

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Appointment of Rani Dhawale of Nagpur on the Welfare Board of Eunuch