पार्टीत पोहोचला कोरोना रुग्ण अन् नागपूरच्या या परिसरातील ७०० जणांना झाला घात

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 9 जून 2020

या पार्टीतील नागरिकांसह परिसरातील नागरिकांनाही टप्प्या-टप्प्याने विलगीकरण केंद्रात पाठविण्यात आले. विलगीकरणात या नागरिकांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले. तपासणी अहवाल पुढे येताच मोठ्या संख्येने नागरिक कोरोनाबाधित असल्याचे पुढे आले.

नागपूर : नाईक तलाव परिसरात एका पार्टीमुळे सातशे नागरिकांना विलगीकरण केंद्रात दिवस काढावे लागत आहेत. विशेष म्हणजे, या पार्टीतील एका कोरोनाबाधितामुळे चक्क 80 नागरिकांना संसर्ग झाला. त्यामुळे दुकाने सुरू झाल्याचा उत्सव साजरा करण्यासाठी आयोजित ही पार्टी सातशे जणांना मनस्ताप देणारी ठरली.

नाईक तलाव परिसर मोमीनपुरा व सतरंजीपुऱ्यानंतर कोरोनाचा 'हॉट स्पॉट' ठरत आहे. गेल्या 28 मेपासून आतापर्यंत येथील सातशे नागरिकांना विलगीकरणात पाठविण्यात आले आहे. सतरंजीपुरा व मोमीनपुऱ्यानंतर एवढ्या मोठ्या संख्येने नाईक तलाव परिसरातून नागरिकांना विलगीकरणात नेण्यात आले. विशेष म्हणजे, यातून आतापर्यंत 80 नागरिक कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले, असे महापालिकेतील अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण गंटावर यांनी सांगितले. विशेष म्हणजे, दुकाने उघडल्याच्या आनंदात एका नागरिकाने या परिसरात मोठी पार्टी केली. याच पार्टीतील एकजण कोरोनाबाधित असल्याचे तपासणीनंतर आढळून आले. त्यानंतर या पार्टीतील नागरिकांसह परिसरातील नागरिकांनाही टप्प्या-टप्प्याने विलगीकरण केंद्रात पाठविण्यात आले. विलगीकरणात या नागरिकांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले. तपासणी अहवाल पुढे येताच मोठ्या संख्येने नागरिक कोरोनाबाधित असल्याचे पुढे आले.

बघा : नागपूरकरांनो, फुटाळ्यावर येताय? जीव ठेवा मुठीत

29 मे रोजी 19 जण, 5 मे रोजी 33 जण कोरोनाबाधित आढळून आले. त्यामुळे नाईक तलाव परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे. याशिवाय दररोज येणाऱ्या तपासणी अहवालातूनही काही जण कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट होत आहे. आतापर्यंत 80 कोरोनाबाधित असल्याचे डॉ. गंटावर यांनी नमूद केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: around seven hundred people quarantine because of single corona patient

टॅग्स
टॉपिकस