लॉकडाऊनमुळे लोककलावंतांचा रोजगार "लॉक'

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 जून 2020


विदर्भात भजन, गोंधळ, जागरण, डायका, हळद, संगीत याशिवाय डोहाळजेवण, मंगळागौरी इत्यादी सांस्कृतिक कार्यक्रम करणारे हजारो लोककलावंत आहेत. या मंडळींनी लोककला जिवंत ठेवली आहे, हे फार मोठे सांस्कृतिक कार्यही मंडळी करीत आहेत. यात महिला कलावंताची संख्या मोठी आहे.

नागपूर : सगळ्यांचेच जिणे आर्थिकदृष्ट्या सुरक्षित नसते. अनेकजण हातावर कमवितात आणि खातात. लोककलांचा पारंपरिक वारसा जपणाऱ्या लोककलावंतांचे जिणे तर आर्थिकदृष्ट्या अनिश्‍चित असते. यंदा या मंडळींपुढे दोन वेळेच्या खाण्याचा प्रश्‍न उभा राहिला आहे. कारण कोरोनामुळे धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम "लॉक' झाले. लग्न सोहळे निवडक लोकांच्या उपस्थितीत होत आहेत. त्यामुळे लग्नाचा हंगाम कमाई न होता वाया गेला आहे. या व्यतिरिक्त हाताला दुसरे काम नाही. आता रोजचा उदरनिर्वाह कसा चालवायचा, असा प्रश्न डायका, जागरण, गोंधळ, हळद व संगीताचे कार्यक्रम करणाऱ्या लोककलावंतांसमोर पडला आहे.

विदर्भात भजन, गोंधळ, जागरण, डायका, हळद, संगीत याशिवाय डोहाळजेवण, मंगळागौरी इत्यादी सांस्कृतिक कार्यक्रम करणारे हजारो लोककलावंत आहेत. या मंडळींनी लोककला जिवंत ठेवली आहे, हे फार मोठे सांस्कृतिक कार्यही मंडळी करीत आहेत. यात महिला कलावंताची संख्या मोठी आहे.

अनेकजणी आपल्या गृपसोबत कार्यक्रम करतात. 10 ते 12 जणींच्या गृपमध्ये कुणी पेटी तर कुणी तबल्यावर साथ देतात. काही जणी सुरेख गायन सादर करतात. कुणाच्या घरी बारसे, लग्न, डोहाळजेवण, मंगळागौर, हळद, संगीत, लग्न असे कार्यक्रम असल्यास, या महिलांना बोलावून कार्यक्रम केले जातात. लॉकडाऊनमुळे संपूर्ण लग्नसोहळ्याचा सिजन निघुन गेला आता आषाढ महिन्याला सुरूवात झाली असली तरी, कुठलेही सांस्कृतिक कार्यक्रमांचे निरोप नसल्याने, कलावंत महिला हताश झाल्या आहेत.

लोककला जपणारे आर्थिक संकटात
डायका, कीर्तन सोहळे आणि इतर कार्यक्रमात मानधन तत्वावर काम करणाऱ्या कलावंताना सध्या कार्यक्रम मिळणेच बंद झाल्याने कलाकार आणि त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. ग्रामीण भागातून अनेक कलाकार हे शहरात येऊन कार्यक्रम करतात. सध्या काम नसल्याने कलाकार गावी गेले. कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे सर्व सांस्कृतिक कार्यक्रम बंद आहेत. परिणामी पोटासाठी अनेक तरुण कलावंत हे दुसऱ्या रोजगाराच्या शोधात भटकत आहेत. पारंपरिक कलाकार लोककलेची जपणूक करतात. यातून जे काही उत्पन्न मिळते. कोरोनाच्या काळात लोकांना एकत्र येण्यास बंदी असल्याने पारंपारिक लोककला जपणारे कलाकार आर्थिक संकटात आहेत.

दुसरा व्यवसाय शोधण्याची आली वेळ
ग्रामीण भागातील यात्रा रद्द झाल्या. कार्यक्रम बंद आहेत. काहीजण हे वेगवेगळ्या गावातील आठवडी बाजार करून उदरनिर्वाह चालवतात. मात्र कार्यक्रमच होत नसल्याने अनेकांची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. गोंधळ आणि जागरणाचे कार्यक्रम करून काहीजण जोड व्यवसाय म्हणून खासगी नोकरी करतात. त्यांच्या नोकऱ्या गेल्या. उत्पन्नाचे दुसरे साधन नाही. अशा स्थितीत काय करायचे हा प्रश्न पडला आहे.  पूर्वीसारखे कार्यक्रम कधी सुरू होतील ते सांगता येत नसल्याने, दुसरा व्यवसाय शोधण्याची वेळ कलाकारांवर आली आहे.

सविस्तर वाचा - शाळा सुरू पण घंटा वाजणार नाही

यावर्षी एकही कार्यक्रम नाही
पारंपरिक कलाकार लोककलेची जपणूक करतात. यातून जे काही उत्पन्न मिळते. आम्ही काही मैत्रिणी मिळून भजन आणि गीतगायनाचे कार्यक्रम करतो. घरगुती कार्यक्रम, लग्नसोहळे यात मोठ्या प्रमाणात आमच्या कार्यक्रमांना मागणी असते. मात्र यावर्षी एकही कार्यक्रम न मिळाल्याने, समुहातील महिला निराश झाल्या आहेत. काहींनी दुसरा व्यवसाय शोधण्यास सुरूवात केली असली तरी, ज्या जेष्ठ कलावंत महिला आहेत त्यांच्या हाताला काहीच काम नसल्याची परिस्थिती आहे.
संगीता महाजन, आई भवानी भजनी मंडळ, कोराडी.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Artist of Lokkala are jobless during lockdown