Video - विदर्भाचे अष्टविनायक : एकाच मंदिरात विघ्नहर्त्याची तीन रूपे.. श्री अष्टदशभुज गणेश, रामटेक 

वसंत डामरे
Tuesday, 25 August 2020

श्री अठराभूजा गणेशाचे मंदिर शहराच्या मध्यभागी शास्री वाॅर्डात आहे.हे मंदिर नागपुरच्या चांदरायण कुटूंबियांच्या पूर्वजांनी बांधले आहे.  अठराभूजा असलेले श्री गणेशाचे महाराष्र्टातील हे एकमेव मंदिर असावे

रामटेक (जि. नागपूर) : विदर्भाची अयोध्या म्हणून प्रसिद्ध असलेल्या रामनगरीला "देवळांचे शहर" म्हणूनही ओळखले जाते.मर्यादा पुरूषोत्तम प्रभु श्रीरामचंद्रांच्या पावनस्पर्शाने पुनित झालेल्या या रामनगरीत विद्येचे आद्यदैवत वैदर्भीय अष्टविनायक श्री अठराभूजा गणेशाचे अतिसुंदर रूप पहायला मिळते.श्री अठराभूजा गणेशाचे मंदिर रामगिरीच्या पायथ्याशी स्थापित आहे.विशेष म्हणजे एकाच मंदिरात विघ्नहर्त्याच्या तीन रूपांचे दर्शन होत असल्याने भाविकांना तिन्ही लोकींचा आनंद अनुभवण्यास मिळतो.

श्री अठराभूजा गणेशाचे मंदिर शहराच्या मध्यभागी शास्री वाॅर्डात आहे.हे मंदिर नागपुरच्या चांदरायण कुटूंबियांच्या पूर्वजांनी बांधले आहे.  अठराभूजा असलेले श्री गणेशाचे महाराष्र्टातील हे एकमेव मंदिर असावे.श्री गणेशाची मूर्ती शुभ्र स्फटिकाची आहे.शैवल्य पर्वतावर श्री अठराभूजा गणेशाचे स्थान आहे.शंबुक मुनींच्या आश्रयाचे स्थान म्हणजे शैवल्य पर्वत .या पर्वतावर विद्याधराची दृष्टीच या अठराभूजा गणेशात आढळते.साडेचार फूट ऊंचीची ही मूर्ती  असून मूर्तीच्या हातात अंकुश,पाश,त्रिशुळ,धनुष्य,परशु आदी विविध शस्रे आहेत.एका हातात मोदक,दुसर्‍या हातात मोरपंखाची लेखणी आहे. श्री गणेशाची सोंड वेटोळी असून झोकदार आहे.

श्री गणेशाच्या डोक्यावर पाच फण्यांचा नाग आहे.गळ्यातही नाग आहे.कंबरेला नागपट्टा आहे.अठरा सिद्धीमुळे श्री अठराभूजा गणेशास "विघ्नेश्वर"म्हणून पूजले जाते.विशेष म्हणजे या अठराभूजा गणेश मंदिरात विघ्नहर्त्याची तीन रूपे आहेत.मंदिरात मध्यभागी महागणपतीची अतिशय सुंदर ,मनमोहक रूप असलेली मूर्ती आहे.त्याच्या उजव्या बाजूस रिद्धीसिद्धी तर डावीकडे श्री अठराभूजा गणेशाची मूर्ती आहे.विघ्नेशाच्या या तिन्ही रूपांच्या दर्शनाने गणेशभक्त रोमांचित होतात.

 

 

या मंदिरात वर्षभर भाविकांचा राबता असतो.प्रत्येक चतुर्थीला भाविकांची मांदियाळी असते.अद्याप या मंदिरात अग्रपूजेचा मान चांदरायण कुटूंबाकडेच आहे.रामटेकच्या प्रसिद्ध शोभायात्रेची सुरवात श्री अठराभूजा गणेश मंदिर येथूनच पूजा,आरती नंतर होते.

१९८० मध्ये श्री अगस्ती मुनी आश्रमाचे प्रमुख दिवंगत संत गोपालबाबांनी या मंदिराचा सर्वप्रथम जिर्णौद्धार केला.त्यानंतर अलिकडे श्री अठराभूजा गणेश मंदिर समितीद्वारे मंदिराचा जिर्णोद्धार करण्यात आला.समितीचे अध्यक्ष हुकूमचंद बडवाईक,उपाध्यक्ष रितेश चौकसे,रविंद्र महाजन,गुलाब वंजारी,सुमित कोठारी,रूषिकेश किंमतकर,नितिन चिंतलवार,रविंद्र मथुरे,विपुल मेंघरे आदी सदस्यगण मंदिराची देखभाल व उत्सवांचे आयोजन करीत असतात.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ashtvinayak in vidarbha Ashtdashbhuj ganesh in Ramtek