बापरे... चोरट्यांनी केले एटीएम लंपास 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 जानेवारी 2020

सोमवारी मध्यरात्रीनंतर सुमारे दोन ते अडीचच्या दरम्यान चोरट्यांनी एटीएम नेले. सकाळी ही घटना उघडकीस येताच परिसरात एकच खळबळ उडाली.

वाडी (नागपूर) : खडगाव येथील अख्खे एटीएम चोरट्यांनी लंपास केल्याची घटना मंगळवारी समोर आली. या मशीनमध्ये अंदाजे चार लाखांहून अधिक रोकड होती. काही दिवसांपूर्वी पाटणसावंगी येथूनही अख्खी मशीन चोरीला गेली होती हे विशेष. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खडगाव मार्गावरील राजू खोब्रागडे यांच्या निवासस्थानी "इंडिया वन' कंपनीचे एटीएम लागले आहे. सोमवारी मध्यरात्रीनंतर सुमारे दोन ते अडीचच्या दरम्यान चोरट्यांनी एटीएम नेले. सकाळी ही घटना उघडकीस येताच परिसरात एकच खळबळ उडाली. भाडेकरूंनी घरमालक खोब्रागडे यांना माहिती दिली. राजू खोब्रागडे घटनास्थळी पोहोचताच त्यांनी एटीएमचे संचालक व वाडी पोलिसांना घटनेबाबात कळविले. 

असे का घडले? - प्रेमासाठी वाट्टेल ते, प्रियकराला वाचविण्यासाठी केले असे..
 

वाडी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्हीची पाहणी केली. सीसीटीव्हीत केवळ पांढऱ्या रंगाची जीप दिसत आहे. एटीएममध्ये नगदी चार लाख व मशीन चार लाख व असा एकूण 8 लाखांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. चोरांचा शोध घेणे पोलिसांसमोर आव्हान ठरले आहे.

अल्ताफ हाजी अहमद हडफा यांच्या तक्रारीवरून वाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. यापूर्वी पाटणसावंगी येथून एटीएम लंपास केल्याची घटना समोर आली होती. दुसरीकडे ही मशीन चोरी करणाऱ्यांनीच खडगाव मार्गावरील मशीन चोरी केल्याचा संशय पोलिसांना आहे. पुढील तपास वाडीचे सहायक पोलिस निरीक्षक संकपाळ करीत आहेत. 

 

चोरीच्या घटनांमध्ये वाढ

 वाडी व आसपासच्या गावात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. नागरिकांत चोरट्यांची दहशत आहे. अलार्म व इतर साधने एटीएम सेंटरमध्ये असताना चोरट्यांनी मशीन चोरून नेल्याने चांगलीच चर्चा रंगली आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ATM theft by thieves